Home Artical Blog जयताळा लास्ट बस स्टॉप ते पायोनियर डॅफोडिल मार्गावरील रस्ता रुंदीकरणाला गती

जयताळा लास्ट बस स्टॉप ते पायोनियर डॅफोडिल मार्गावरील रस्ता रुंदीकरणाला गती

0

मनपा आयुक्तांची प्रत्यक्ष पाहणी

कार्यवाहीचे निर्देश

नागपूर (Nagpur):- जयताळा लास्ट बस स्टॉप ते पायोनियर डॅफोडिल या मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाच्या मागणीला अखेर गती मिळाली आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन इटनकर यांनी सोमवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.

या रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पारेंद्र पटले यांनी यापूर्वी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले होते. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या पत्रात जयताळा बस स्टॉप ते पायोनियर डॅफोडिल या मार्गावरील रस्त्याची रुंदी अपुरी असल्याने परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका तसेच आपत्कालीन सेवांच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासनाने या विषयावर हालचाली सुरू केल्या. त्याच अनुषंगाने आज मनपा आयुक्त विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली.

पाहणीदरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या घरमालक व नागरिकांच्या हिताचाही विचार करण्यात आला. संबंधितांना शासनाच्या नियमांनुसार योग्य मोबदला देण्यात यावा तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने राबविण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणीवेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन इटनकर, एडीपी विभागाचे ऋतुराज जाधव, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष पारेंद्र पटले, भाजप नेते आनंद नितनवरे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयताळा परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अपघातांचे प्रमाण घटेल तसेच परिसराच्या विकासाला नवी चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
…….