रुजतेय वाचन संस्कृती Rooted reading culture

आताच 15 ऑक्टोबरला जागतिक वाचन प्रेरणादिन झाला. त्या निमित्ताने काही चिंतने आपसूकच प्रकट झाली. ती मांडण्यासाठी हे व्यासपीठ योग्य वाटले.

बरोबर दहा वर्षांपूर्वी वर्धा जिल्यातील  एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विजय सातवीच्या वर्गात शिकत होता.  पहिल्या बाकावर बसणारी मुले गुरुजींच्या प्रश्नांची उत्तरे पोपटाप्रमाणे देत. त्या सर्वांचा वर्गात, शाळेत व मोहल्ल्यात हुशार मुले म्हणून नावलौकिक होता. विजय रस्त्याच्या बाजूच्या झाडाखाली विचारमग्न बसला होता. गुरुजींची स्वारी रस्त्यावरुन जात होती. गुरुजींकडे त्याचे मुळीच लक्ष नव्हते.  गुरुजी पाठमोरे गेल्यावर त्याच्या ते ध्यानात आले. दुसऱ्या दिवशी विजय कचरतच शाळेत गेला. ‘काही मुले जरड चण्यासारखी असतात, कितीही शिजवा भांड्यातले पाणी आटेल, अथवा सिलेंडरमधील गॅस संपेल; परंतु ते शिजणार नाही म्हणजे नाहीच’. विजयकडे पाहत गुरुजींनी टॉण्ट मारला होता. विजयची अस्वस्थता वाढली. घरात अठराविश्व दारिद्र्य, घरात कुणाला बसण्याकरिता धड गोंड पाटही नव्हता. शिकवणी लावणे तर सोडाच, साधी इंग्रजीची गाईड घेण्यासाठी विजयने आईकडे नांदा लावला होता. शेवटी शेजारच्या रामूच्या पुस्तकातून त्याने अभ्यास केला आणि सातवीच्या परीक्षेत तो कसाबसा पास झाला. 

       एके दिवशी शाळेतून सुट्टी झाल्यावर नेहमीप्रमाणे विद्यार्थी लगबगीने घराकडे निघाले. ‘अरे लेका विजय ते सावरकर सर दोन दिवसांचे शिबिर आपल्या मोहल्ल्यात  घेणार आहेत म्हणे आन त्या शिबीराचे नाव म्हणे ‘पुस्तकदोस्ती शिबीर आहे. फुकटात गायडन्स   करणार आहेत लेका, आपण जाऊ त्या शिबिराला. लांब लांब टांगा टाकत रामू पुढे आला आणि विजयला मोठ्या उत्साहाने सांगू लागला.  विजयने पण लवकरच होकार दिला आणि दोघेही शिबीरास्थळी पोहोचले. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिबिरात सहभागी होण्याकरिता जमा झाले होते.  आपल्या अंतर्मनाशी कुणीतरी संवाद साधावा, असे विजयला नेहमीच मनोमन वाटायचे. पिंपळाच्या झाडाच्या सावलीत आकाशाच्या विस्तीर्ण  छताखाली आयोजित या पुस्तकदोस्ती शिबिरात सावरकर सर यांचे आगमन झाल्यानंतर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर शिबिरार्थ्याशी  संवाद साधतांना  शिक्षण घ्यायचे म्हणजे काय करायचे? असा पहिलाच प्रश्न विचारून सर्वांच्या मनाचा ठाव घेतला होता.  सर्व मुले एकटक पहात, सर पुढे काय बोलणार याकडे कान देऊन होते.

पुस्तके वाचून…… ज्ञानाच्या आधारे मांडलेली प्रमेये…. केलेली अचूक भाकिते, हाच खरा शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा!

सर आले, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणी सर्वांना जिंकले.  विजय ज्या शोधात होता ते आज त्याला गवसले  होते. खरे तर विजयला विजयपथच मिळाला होता. मनातल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला मिळाली होती.  दुसऱ्या दिवशी विजयने सरांना स्व परिचय करून दिला.  स्वतःची आर्थिक परिस्थिती विशद केली.  शिक्षणाप्रती प्रेरित झालेल्या विजयच्या डोळ्यातील चकाकी सावरकर सरांनी टिपली होती आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विजयला खरा मार्गदर्शक मिळाला होता. असे  असंख्य विजय पुस्तकदोस्ती शिबिरातून घडविण्याचे कार्य करताहेत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक सचिन निवृत्तीनाथ सावरकर. लहान मुलांना वाचनाची आवड लागावी या ध्येयाने प्रेरित होऊन सुरू केलेल्या पुस्तकदोस्ती उपक्रमाने आता विदर्भात शैक्षणिक चळवळीचे रूप धारण केलेले आहे.  वाचन हा संस्कार असून लहानपणापासूनच तो रुजिवणे ही आज शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक गरज आहे.  ही काळाची गरज ओळखून सचिन सावरकर आणि त्यांच्या सहकारी संस्काराच्या व मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कर्तव्य व जबाबदारी कळावीत आणि त्यांच्यात परस्परभाव,  आत्मविश्वास, सहकार्य, त्याग आदी  गुणांचे बीजारोपण व्हावे याकरिता प्रत्येक रविवारी गावोगावी हिंडून पुस्तक दोस्ती शिबिरातून कृतीयुक्त मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्या या कार्यात त्यांना अमोल पालेकर, सुहास लुतडे, विवेक महाजन, वैभव भुरे सुनील पोराटे, जयश्री घवघवे फरीन शेख, शितल सावरकर ही विदर्भातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी तरुण मंडळी सहकार्य करीत आहे.  सचिन सावरकर व त्यांना निस्वार्थ भावनेने वाचनसंस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवक युवतीचे कार्य इतरांना प्रेरणादायी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.