साखर कारखान्यात अडकलेला निधी परत देण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, काहींची धरपकड

औरंगाबाद : साखर संचालक कार्यालयासमोर  आंदोलन करणाऱ्यासाठी  जाणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. तर काही आंदोलकांची पोलिसांकडून धरपकडदेखील करण्यात आली.

गंगापूर साखर कारखान्यात अडकेली रक्कम परत मिळावी यासाठी कारखान्याचे सभासद आणि शेतकरी साखर संचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी निघाले होते. यावेळी आंदोलक क्रांती चौकात जमले असताना त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. तसेच काही आंदोलकांची धरपकडही केली.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरात साखर कारखाना संचालकांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी मोर्चासाठी शेकडो शेतकरी तसेच सभासद आंदोलनासाठी जमले होते. या आंदोलकांकडून कारखाना सभासदांचे अडकलेले पैसे परत करण्याची मागणी जात आहे. मोर्चा काढून प्रश्न सुटत नसल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. त्याचाही परिणाम झाला नाही शेवटी शेतकऱ्यांनी क्रांती चौकातील मुख्य रस्ता अडवला. यानंतर आंदोलन आणखी चिघळलं, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवलं. यावेळी पोलिसांनी प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, हा लाठीचार्ज झाल्यानंतर आमदार प्रशांत बंब क्रांती चौकात दाखल झाले. त्यांची आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली.

आंदोलन कशासाठी ?

गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. मात्र, खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे. सभासदांनी जमा केलेला हाच निधी परत मिळावा म्हणून शेतकरी तसेच कारखान्याचे सभासद यांच्याकडून औरंगाबादेतील क्रांतीचौकात आंदोलन सुरू होते. यावेळी आंदोलन करताना त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. तसेच काही आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.