संजय राऊतांचे कोथळा काढण्याचे वक्तव्य; भाजपा करणार पोलिसात तक्रार

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात शिवसेनेच्या एका कार्यक्रमात केलेल्या कोथळा काढण्याच्या वक्तव्याप्रकरणी राऊतांविरोधात पुण्यात भाजपा तक्रार दाखल करणार आहे. डेक्कन पोलिस ठाण्यात भाजप संजय राऊत यांच्याविरोधात लेखी तक्रार अर्ज दाखल करणार आहे.
‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोथळा बाहेर काढू असे वक्तव्य केले आहे. ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. त्यांनी एक प्रकारे धमकी दिली आहे. नारायण राणेंना शुल्लक कारणे दाखवून अटक केली. आज आम्ही संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही असेही भाजपाने म्हटले आहे.
दरम्यान, याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, पाठीत खंजीर खुपसण्याची आपली परंपरा नाही. आपण समोरून वार केला आहे. कोणावर कोण खटला दाखल करताय ते बघावे लागेल. त्यांना शिवचरित्र पाठवू आणि कोथळा काढणे म्हणजे काय याचा अर्थ सांगू असेही संजय राऊत म्हणाले. आम्ही शिवरायांचे मावळे आहे आणि पाठीमागून वार करत नाही. समोरून कोथळा काढतो असे म्हटले होते. त्यांना याचा एवढा त्रास झाला की थेट गुन्हेच दाखल करायला सांगितले. आता समोरून वार केल्यावर कोथळाच निघणार ना? असा सवाल राऊतांनी केला.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.