सीरमने वाढविले कोविशिल्ड लसीचे दर

पुणे, 21 एप्रिल : अदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसीच्या दरात वाढ केलीय. सीरमच्या एका डोसची किंमत सरकारी रुग्णालयात 400 रुपये तर खासगीसाठी 600 रुपये करण्यात आलीय. यापूर्वी ही लस सरकारी रुग्णालयात निःशुल्क मिळत असे तर खासगीमध्ये 250 रुपयांना उपलब्ध होती. सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनावाला यांनी सांगिंतले की, येत्या दोन महिन्यात आम्ही लसीचे उत्पादन वाढवणार आहोत. सीरम इन्स्टिट्यूटच्या उत्पादन क्षमतेच्या एकूण 50 टक्के लसी या भारत सरकारला देण्यात येतील तर 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटलना देण्यात येतील. सीरम इन्स्टिट्यूटने असा दावा केला आहे की, त्यांची लस जगातील इतर लसींच्या तुलनेत स्वस्त आहे. जागतिक लसींचा विचार करता अमेरिकेत फायझर आणि मॉडर्नाची लस ही 1500 रुपयांना मिळते तर रशियाची स्पुटनिक व्ही लस ही 750 रुपयांना मिळते. तसेच चीनच्या लसीची किंमतही 750 रुपये इतकी आहे. त्यामुळे भारतात विक्री करण्यात येणारी कोविशिल्ड त्या तुलनेत स्वस्त आहे. आतापर्यंत सीरमची कोव्हीशिल्ड ही लस केंद्र सरकारला 150 रुपयांना मिळत होती, ती राज्य सरकारांना आता 400 रुपयांना खरेदी करावी लागणार आहे. केंद्र सरकारला बिल अॅन्ड मेलिंडा गेट्स फौंडेशनकडून सुरुवातीच्या काळात लस खरेदीसाठी जे अनुदान देण्यात आले त्याचा फायदा झाला आणि कमी किमतीत लस मिळाली. मात्र आता राज्य सरकारांना मात्र त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारकडून सिरमला 3 हजार कोटी रुपये  देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता लसीकरणाच्या कार्यक्रमाला देण्यासाठी केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांना 4500 कोटी रुपये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूटला 3 हजार कोटी रुपये तर भारत बायोटेक कंपनीला 1500 कोटी रुपयांची मदत देण्याला मंजुरी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनावाला यांनी लसीच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 3000 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली होती. 

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.