शिवसेना खासदार भावना गवळींकडून जिवाला धोका असल्याचा उपजिल्हा प्रमुखाचा आरोप

नागपूरः यवतमाळ-वाशिममधील शिवसेनेतील कलह चव्हाट्यावर आला आहे. खासदार भवना गवळी यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हरीश सारडा यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यावर सध्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गवळी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सारडा यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. सारडा यांनी सांगितले की, माझ्यावर यापूर्वीही दोन वेळा हल्ले झाले. धमकी देण्यात येत आहे. पोलिसांनी सुरुवातीला संरक्षण दिले आणि नंतर काढून घेतले. पोलिस उपअधीक्षकांनी मोबाइल जप्त केला. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. गवळी यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील शंभर कोटी रुपयांचा श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना २५ लाख रुपयात खरेदी केला. त्यांचे खासगी सचिवांच्या भावना अॅग्रो प्रॉडक्ट अॅण्ड सर्व्हिसेसच्या नावावर हा व्यवहार झाला. हा घोटाळा उघडकीस आणल्यापासून धमक्यांचे फोन येत आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही अद्याप कारवाई झाली नाही. पोलिसांची खासदारांना साथ लाभली आहे. त्यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे सारडा म्हणाले. गवळी यांच्या १२ संस्था व ७ कंपन्या आहेत. ३ कंपन्यांच्या संचालक आहेत. ही माहिती त्यांनी दडवली. सरकार वा पक्षाचे त्यांना कोणतेही समर्थन लाभलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचीही गवळी यांनी दिशाभूल केली. आपण शिवसेना सोडलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.