सर्पदंशाने बहीण-भावाचा मृत्यू, दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथील घटना

दर्यापूर (अमरावती) : शिक्षणासाठी मावशीकडे वास्तव्यास असलेल्या बहीण-भावाला गाढ झोपेत सापाने चावा घेतला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच दोघांचाही करुण अंत झाला. ही हृदयद्रावक घटना दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथे आज, रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़
पवन बाळू चव्हाण (१८) व स्वाती बाळू चव्हाण (१३) अशी मृतकांची नावे आहेत. भातकुली तालुक्यातील दाढी पेढी येथील मूळचे रहिवासी असलेले पवन व स्वाती आपल्या आई-वडिलांसह थिलोरी येथील रहिवासी मावशीकडे वास्तव्यास होते. दोघेही शिक्षणासोबतच शेतीची कामेसुद्धा करीत होते. शनिवारी दिवसभर दोघा बहीण-भावाने कुटुंबासोबत शेतात काम केले. रात्री जेवन करून दोघेही घरी झोपी गेले. रात्री दीड वाजताच्या सुमारास घरामागील शेतातून साप त्यांच्या घरात शिरला़ यावेळी सापाने झोपेत असलेल्या पवन व स्वाती या दोघांना चावा घेतला. त्यामुळे काही वेळातच दोघांचीही प्रकृती बिघडली. साप चावल्याची बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर दोघांनाही तातडीने दर्यापूर शहरातील बनोसा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, तेथे उपचाराची सोय नसल्याने व दोघांचीही प्रकृती चिंताजनक होऊ लागली. दरम्यान त्यांना अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे नेण्यात आले़ मात्र, वाटेतच दोघाही बहिण-भावाचा मृत्यू झाला.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.