मेढय़ाच्या नावाखाली पळसाची कत्तल

कळमेश्‍वर

शेतात वर्षभर राबणार्‍या बैलांसाठी व शेतकरी बांधवांसाठी पोळा हा सण म्हणजे पर्वणीच असतो. पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांची खांदेशेकी कार्यक्रम उत्साहात साजरा करून त्याला पोळ्याच्या दिवशी पंचपक्वानासह पुरणपोळीचा नैवद्य दिला जातो. याच पोळय़ात पारंपरिक महत्त्व असलेल्या मेढय़ाच्या नावाखाली पळसाच्या झाडाची कत्तल केली जाते. या परंपरेचे पालन आजही नित्यनेमाने ग्रामीण व शहरी भागात केले जात आहे.
पोळय़ाच्या सणाचा एक भाग म्हणजे पोळ्याच्या दिवशी घरातील मुख्य दारासमोर दोन्ही बाजूला दोन मोठय़ा पळसाच्या फांद्या ठेवून गृहलक्ष्मीद्वारे त्याची पूजा केली जाते. दुसर्‍या दिवशी घरातील द्रारिद्रय़, रोगराई, ईडापिडा घेऊन जागे मारबत, अशी हाक देत ते मेढे नदी काठी नेऊन जाळले जातात. मात्र, या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेसाठी आजही पळस झाडांची मोठय़ा प्रमाणात कटाई करण्यात येते. घरात जितके दरवाजे तितक्या फांद्या (मेढे) ठेवल्या जातात. एकीक डे भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन आणि पालन होत असले तरी, दुसरीकडे मात्र या पळसाच्या झाडाच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याचे दिसते.
घरातील प्रत्येक दारासमोर पळसाच्या दोन फांद्या ठेवण्याऐवजी मुख्यदारावर पळसाच्या दोन फांद्या ठेवल्यास परंपरेचे पालन सोबत पर्यावरणाचे रक्षणसुद्धा करता येते. परंतु याकडे दुर्लक्ष करून पोळा सणानिमित्त हजारोच्या संख्येत पळसाच्या झाडांची कत्तल करण्यात येते. एकीकडे शासन पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास पाहता मोठय़ा प्रमाणात दरवर्षी वृक्षरोपण मोहीम राबवून ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र देत असले तरी त्याचे पालन कितपत होते, यावरून स्पष्ट होते. पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास थांबविण्यासाठी वृक्षांचे जतन करणे आवश्यक आहे. पोळा हा सणानिमित्त कमीतकमी पळसाच्या झाडांची कटाई केल्यास संस्कृती परंपरेचे आणि पर्यावरणाचेसुद्धा रक्षण आपल्याला करता येईल, हे विशेष.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.