सोलापूर – पदाधिकारीच कामे अडवतात, निवडणुका अवघड

सोलापूर ६ सप्टेंबर : आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडूनच कामे अडवली जात आहेत. आमचे सरकार असतानाही शेतीसाठी पाणी सोडले जात नाही. तसेच पक्षातील गट-तट संपल्याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणे शक्य नसल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्या. त्यावर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन केले.

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात बैठक झाली. अद्याप तालुका कार्यकारिणी जाहीर केली नाही. आमदार भालके असताना कामात अडचणी येत नव्हत्या. परंतु पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या निर्णयाचे अधिकार आपल्याकडे घेतले आहेत. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक कामे अडवली जात आहेत. मग आम्हाला बैठकीला कशा बोलावता? असा सवाल शिरनांदगीचे सरपंच गुलाब थोरबोले यांनी केला. तसेच आमचे सरकार असतानाही शिरनांदगी तलावात पाणी सोडले जात नाही. म्हैसाळ योजनेचेही पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. तर माजी सभापती संभाजी गावकरे यांनी पक्षातील गट-तट संपल्याशिवाय आगामी पंचायत समिती, नगरपालिका निवणुका जिंकणे अशक्य असल्याचे म्हटले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.