Home Artical Blog सोलापूरचे कलेक्टर आता नागपूरच्या धुरीणपदी

सोलापूरचे कलेक्टर आता नागपूरच्या धुरीणपदी

0

नागपूर(Nagpur): राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा कायम असून प्रशासनात मोठी हालचाल सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश होता, तसेच प्रथमच मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी महिला अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, आणखी दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली करण्यात आली असून ते नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. सध्या कार्यरत असलेले डॉ. बिपीन इटणकर यांच्याकडून ते पदभार घेतील.

सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असताना कुमार आशीर्वाद यांनी विकासकामांमध्ये ठसा उमटवला. विमानतळ प्रकल्प, पंढरपूर वारी व्यवस्थापन, आयटी पार्क उभारणी तसेच सीना नदीच्या पुरस्थितीत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले. कडक शिस्त, तत्परता आणि धाडसी निर्णयक्षमतेमुळे त्यांची ओळख एक सक्षम व युवा प्रशासक अशी निर्माण झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणूनही त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

कुमार आशीर्वाद हे 2016 बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या जागी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यपदी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2011 बॅचचे केरळ केडरचे आयएएस अधिकारी असून वैद्यकीय शिक्षण (MBBS) घेतलेले आहेत.

यापूर्वी 31 मार्च रोजी राज्य सरकारने 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. त्या बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. अनेक जिल्हा परिषदांतील शेकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या बदलीची चर्चा रंगली होती.

नवीन बदल्यांमुळे प्रशासनात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला आहे.