सोयाबीन गेले, आता पीकविमा मिळवून द्या

खापा (घुडन) : सोयाबीनचे बियाणे निघाले नाही, या शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतरही शेतकर्‍यांना न्याय मिळाला नाही. यावर ही मात करीत शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरले. पण आता रोगाचा प्रादुर्भाव झाला व आता शेतकर्‍यांवर खराब झालेल्या पिकांवर रोटावेटर चालविण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी ५0 ते ६0 टक्केपेक्षा जास्त नुकसान होऊनही पीकविमा कंपनीकडून विमा मिळाला नाही. तर शासनाने शेतकर्‍यांना अल्पशी मदत दिली होती. आता पुन्हा सोयाबीनचे नुकसान झाले आहे. यामुळे शासनांनी कृषी विभाग, महसूल विभाग व पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. तसेच विमाधारक शेतकर्‍यांना विमा मिळून द्यावा.
प्रवीण जोध
माजी सभापती, पंचायत समिती, नरखेड.नरखेड तालुक्यातील बहुतांश सोयाबीन व कापूस पिकाची लागवड केली जाते. मागील २ वर्षापासून ऐन तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत आहे. अनेक प्रकारच्या नवनवीन रोगाने सध्या पिकाला ग्रासले आहे. अशाताच आता पेरणीसाठी वापरले जाणार्‍या बियाण्यावर संशोधन करणे गरजेचे ठरत आहे. जेणेकरून शेतकर्‍यांचे यामुळे नुकसान होणार नाही.

नरखेड व काटोल तालुक्यात सोयाबीनचे पीक ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना अचानक सोयाबीन पिकावर तांबेरा (यलो मोझ्ॉक) व खोडकिड्याचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन झाडाचे पाने पिवळे पडून झाडे वाळत आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या सोयाबीनची पाहणी करून कृषी आणि महसूल विभागाने गावनिहाय सर्वेक्षण करून नुकसानीचा अहवाल शासनाला त्वरित पाठवण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच सोयाबीनचे पीक हातचे गेले, आता शासनाने मदत करण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे.
कापसाच्या नुकसानीमुळे यावर्षी शेतकर्‍यांनी त्यांचा कल सोयाबीनकडे वळविला. सुरुवातीपासूनच शेतकर्‍यांनी तांबेरा व खोडकिड्याच्या नियंत्रणसाठी महागडे कीटकनाशके व बुरशीनाशकांची टप्प्याटप्प्याने फवारणी केली. परंतु सोयाबीन ऐन शेंगा भरण्याच्या स्थितीत आल्यावर तांबेरा व खोडकिड्याचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीनचे पाने वाळून झाडे नष्ट होत आहे.
याबाबत नरखेड व काटोल तालुक्यातील शेतकर्‍यांनी तक्रार केली आहे. तरी पण शासन स्तरावर नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे कार्य सुरू झालेले नाही. कृषी विभागाने सोयाबीन नुकसानीचे गावनिहाय सर्वेक्षण, बियाण्यांची जात, पेरणीची तारीख, विमा काढला का, शेतकर्‍याचा मोबाईल नंबर यांची गावनिहाय यादी करून शासनाला त्वरित पाठविण्याची गरज आहे. सोबतच सोयाबीन दरवर्षी शेंगा भरतानाच नेमके पिवळे पडून वाळत असल्याने याच्या मागच्या मुख्य कारणाचा शोध घेऊन अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी कृषी विद्यापीठाच्या कृषिशास्त्रज्ञ व कृषी अधिकार्‍यांनी संशोधन करणे आता आवश्यक झाले आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीशी शासनाने उभे राहून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. पीकविम्याचा अनुभव वाईट असल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला नसल्यामुळे त्यांच्या आशा आता शासनाच्या मदतीवर अवलंबून आहे. ज्या शेतकर्‍यांनी विमा काढला, त्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई भरून मिळून देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.