राज्य सरकार लॉकडाऊन वाढविण्याच्या विचारात?

Share This News

मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण बरेच कमी झाले असल्याने लॉकडाऊन मागे घेतले जाण्याची शक्यता सर्वसामान्य जनतेत व्यक्त होत असताना राज्य सरकार मात्र कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नाही. लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढविले जाऊ शकते, असे संकेत मिळत असून त्यावर अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात अपेक्षित आहे.
सध्या १ जूनच्या पहाटेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण बरेच खाली आले आहे. रुग्णवाढीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे १ जूननंतर लॉकडाऊन मागे घेतले जाईल, अशी चर्चा जनसामान्यांमध्ये ऐकायला मिळत आहे. मात्र, राज्य सरकार वेगळ्याच मनस्थितीत असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी बोलताना दिले. मंत्रिमंडळाच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत लॉकडाऊन वाढविण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यावर कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय झाल्यास रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांत काही प्रमाणात सवलती दिल्या जातील, असे संकेत टोपे यांनी दिले आहेत.
राज्यात सध्या २२ लाख १८ हजार २७८ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत तर १९ हजार ९९६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत, असे त्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.