यावर्षीही बाप्पाचे दर्शन मंडपात नाही

राज्य सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : गणेशत्सवासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता गणपतीबाप्पाचे प्रत्यक्ष मंडपात येऊन किंवा मुखदर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दर्शन केवळ आॅनलाइन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘श्रीं’च्या आगमन व विसर्जन मिरवणुका देखील काढता येणार नाहीत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील तसेच इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा आॅनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी, असेही मार्गदर्शक सूचनांत स्पष्ट करण्यात आले आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.