लॉकडाऊनसाठी राज्यांना घ्यावी लागणार केंद्राची परवानगी, असे आहेत नवे नियम

केंद्र सरकारसोबत चर्चा केल्याशिवाय कोणत्याही राज्याला कंटेनमेंट झोनच्याबाहेर राज्यात, शहरात आणि तालुक्यात ‘लॉकडाऊन’ जाहीर करता येणार नाही.

केंद्राबरोबर चर्चा केल्यानंतरच ‘लॉकडाऊन’ बाबत निर्णय घेता येणार आहे. केंद्र सरकारने कोव्हिड-19 संदर्भात राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

देशामध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने ही लाट अधिक तीव्र असेल अशी शक्यता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी वर्तवली होती.

सामनाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना लॉकडाऊन लावण्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, “पुन्हा निर्बंध नको असतील तर जनतेने त्रिसूत्री पाळावी आणि काही प्रमाण सोडलं तर बरीचशी लोकं ती पाळत आहेत. लॉकडाऊनचा जो मुद्दा होता, तुम्ही म्हणताय की तो पुन्हा लावाला लागेल का? तर आपण काय पत्करणार? आयुष्य की धोका? हे ठरवा. मला असं वाटतं की जवळपास सगळा महाराष्ट्र आपण उघडलेला आहे. तो पुन्हा बंद करावा अशी माझी काय कोणाचीच इच्छा नाही. पण बंद होऊ न देणं हे प्रत्येकाचं काम आहे.”

सणाचे दिवस आणि त्यात हिवाळा यामुळे लोकांनी अधिका काळजी घेणं गरजेचं असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटलं होतं.

केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचना:

 • राज्य सरकार परिस्थितीप्रमाणे कोरोनावर नियंत्रणासाठी शहरात ‘नाईट कर्फ्यू’ सारखा निर्बंध घालू शकतात.
 • ऑफिसमध्ये सोशल डिस्टंसिंग अनिवार्य करावं.
 • कोरोना वाढीचा दर 10 टक्के असणाऱ्या शहरांनी ऑफिसच्या वेळा बदलण्याबाबत निर्णय घेऊन योग्य अंमलबजावणी करावी.
 • ऑफिसमध्ये एकावेळी काम करणाऱ्या लोकांची संख्या नियंत्रणात ठेवावी
 • राज्यांतर्गत आणि दोन राज्यातील प्रवासावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतील.
 • वस्तूंच्या वाहतुकीवर बंधनं नाहीत.

लोकांसाठी सूचना

 • मास्क, हातांची स्वच्छता आणि सोशल डिस्टंसिंगवर भर देण्यात यावा.
 • मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार.
 • गर्दी जास्त होणारी ठिकाणं- बाजार, मार्केट आणि सार्वजनिक वाहतुकीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील. त्यांचं काटेकोर पालन करावं.

अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चिती करावी

जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोकण्यासाठी योग्य पावलं उचलावीत. सरकारने अशा अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी.

आरोग्याच्या उपाययोजना

 • फ्ल्यू आणि इंन्फ्लूएन्झा आजारांच्या रुग्णांचा शोध घेऊन योग्य उपचार करावेत.
 • हाऊस-टू-हाऊस सर्वेक्षण करण्यात यावं.
 • कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना बाहेर पडण्याची मुभा.
 • कंटेनमेंट झोनच्या बाहेर कोणीही पडू नये यासाठी कडक उपाययोजना कराव्यात.

कोरोनाबाबतचे निर्णय केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंसह देशातील काही मुख्यमंत्र्यांनी केला होता. आता पुन्हा लॉकडाऊन जाहीर करू नका, अशी सूचना केंद्राने दिल्यामुळे राज्य आणि केंद्र असा वाद पुन्हा निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही पण ‘या’ निर्बंधांचं करावं लागणार पालन

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले आहेत. कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“कोरोनाची दुसरी लाट नव्हे तर त्सुनामी ठरेल की काय अशी भीती वाटते,” या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केलं.

आतापर्यंत सरकारनं वेळोवेळी जारी केलेले अनलॉक आणि कोरोना संदर्भातले सर्व नियम अजूनही लागू आहेत. त्यांचं सर्वांनी तंतोतंत पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.