गोरेवाड्यात उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील

आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय घोषित झाल्यानंतर गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात उच्च दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सुविधांची कार्यवाही चार टप्प्यात बांधकाम करण्यात येणार असून, त्यासाठी लागणार्‍या निधीसाठी एकसंघ आणि परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिले.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय येथे सोमवारी (२१ डिसेंबर) पालकमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार राजू पारवे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महाव्यवस्थापक हृषिकेश रंजन, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक पी. बी. पंचभाई, वास्तूविशारद अशफाक अहमद आदी उपस्थित होते. राज्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांच्याकडे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाच्या संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. गोरेवाडा विकास प्रकल्पाने निधीसाठी पाठविलेला प्रस्ताव पर्यटन मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवतील. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर प्राणीसंग्रहालयासाठी आवश्यक निधी विविध टप्प्यात मिळेल. तो मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने येथे उच्च दर्जाच्या सुविधा उभारण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यातील पर्यटन सुविधांचे काम पूर्ण झाले असून, लवकरच दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात वाघ, बिबट्या, अस्वल आणि हरिण आदी चार जंगल सफारी सुरू करण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात आफ्रिकन सफारीसाठी काम सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, त्यासाठी लागणारा निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले. राज्यात पर्यटनवाढीला चालना मिळावी. राज्यातील विविध पर्यटनस्थळांकडे ओघ वाढावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. नागपुरात उमरेड कर्‍हांडला, पेंच आदी अभयारण्यानंतर गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय सुरू झाले आहे, याकडे लक्ष वेधून या संपूर्ण प्रकल्पाचा एकसंघ आणि परिपूर्ण माहितीचा प्रस्ताव तयार करून तो पाठविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. गोरेवाडा येथे पक्ष्यांसाठीही जागा राखीव ठेवून तेथे बर्ड पार्क बनविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. आफ्रिकन सफारी, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आदी विविध विकासकामांसाठी लागणार्‍या निधीबाबत एकत्रित प्रस्ताव तयार करून तो पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संग्रहालयाची पाहणी करीत परिसरातील विकासकामांचा आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.