…. तर जावेद अख्तरना तालिबानने चौकात फटके मारले असते : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : ‘जे वक्तव्य जावेद अख्तर यांनी भारतात केले ते वक्तव्य त्यांनी तालिबानमध्ये केले असते, तर त्यांना तालिबानने चौकात फटके मारले असते…’ असे विधान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात सध्या भाजपाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या वक्तव्याबद्दल जावेद अख्तर यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे. शिवाय, भाजपाच्या काही नेत्यांनी जावेद अख्तर यांना थेट अल्टिमेटमही दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे.

‘मला असे वाटते हा एक अयशस्वी प्रयत्न आहे. नेहमीच देशाच्या संदर्भात त्यांची भूमिका ही संशयास्पद राहिलेली आहे. तसेच, या ठिकाणी जर या संस्था आणि संघटना या तालिबान्यांसारख्या वागल्या असत्या, तर जसे अफगाणिस्तानच्या एखाद्या चौकात उभा राहून तालिबान्यांना शिव्या दिल्यानंतर, काय हाल होतात हे तुम्ही पाहिले असेल. तसे हाल इथे झाले नसते? पण इथे त्यांच्या या वक्तव्याची काही लोकांनी, मीडियामध्ये देखील मोठ्याप्रमाणावर नोंद घेतली. याचा अर्थ इथे देशात ज्यांची सत्ता आहे, ते रामराज्य आणण्याची कल्पना करणारे लोक आहेत. बजरंग दलाबद्दल नाव घेताना, त्यांच्या मनात बजरंग किंवा राम भक्ताबद्दलची जी काही असुया आहे, ती अप्रत्यक्ष व्यक्त झाली. अशी कोणतीही घटना देशात झाली नाही. त्यांच्या घरावर कुणी लोक गेले नाहीत किंवा केंद्राने पोलीस पाठवले नाहीत. त्यांना अटक करत ५०५(२)चा गैरवापर केला नाही.’ असेदेखील मुनगंटीवार यांनी बोलून दाखवले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.