‘नीट-यूजी’ परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : देशात येत्या १२ सप्टेंबर रोजी होऊ घातलेली ‘राष्ट्रीय पात्रता सह-परीक्षा’ अर्थात ‘नीट-यूजी’ पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट नकार दिला आहे. परीक्षेच्या वेळापत्रकात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. तसेच परीक्षेची तारीख बदलणे अनुचित होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  न्या. ए. एम. खानविलकर, न्या. ऋषिकेश रॉय व न्या. सी. टी. रविकुमार यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने म्हटले की, ‘नीट-यूजी’  परीक्षेच्या तारखेबाबत प्रत्येक विद्यार्थी समाधानी असत नाही. ९९ टक्के उमेदवारांना परीक्षा गैरसोयीची वाटतही असेल. परंतु, परीक्षा द्यायची की नाही, याचा निर्णय विद्यार्थ्यालाच घ्यावा लागतो. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांपुढे  आपले म्हणणे मांडावे. तशी त्यांना मुभा आहे, असे खंडपीठाने नमूद केले. दरम्यान, याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील शोएब आलम यांनी युक्तिवाद केला. १२ सप्टेंबरच्या दरम्यान अनेक परीक्षा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे ‘नीट-यूजी’ परीक्षा टाळण्याचा आग्रह आलम यांनी केला होता. पण, नीट-यूजी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे. देशपातळीवर आयोजित होणारी ही परीक्षा असल्याने त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.