*बहुचर्चित “सूरज बहुरिया” हत्याकांडातील मुख्य आरोपी ला अटक !* *एलसीबी चे निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई !

एकंदर 10 आरोपी अटकेत !*

चंद्रपुर (बल्लारपुर) :
चंद्रपूर : बल्लापुरातील बहुचर्चित सुरज बहुरिया हत्याकांडाच्या मुख्य आरोपी आकाश उर्फ चिन्ना आनंद अंदेवार (वय ३१, रा. बल्लारपूर) याला बुधवार ४ तारखेला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. 9 ऑगस्ट रोजी सुरज बहुरिया यांच्या जन्मदिनी भररस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाला दारू व कोळसा तस्करीचा रंग असल्याचे सांगण्यात येत होते हत्याकांडातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती तर मुख्य आरोपी असलेला आकाश उर्फ चिन्ना आनंद अंदेवार हा फरार होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आनंद अंदेवारला बुधवारी अटक केली. या प्रकरणातील आरोपीची संख्या आता दहा झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात धनराज करकाडे, अमोल धंदरे, गोपाल आकुलवार, प्रशांत नागोसे, संदीप मुळे यांच्या पथकाने केली.
बल्लारपुरातील आंबेडकर वॉर्डात सूरज चंदन बहुरिया (वय ३६) हा राहत होता. सूरज आणि आरोपी आकाश उर्फ चिन्ना आनंद अंदेवार हे दोघेही एकाच व्यवसायात कार्यरत होते. परंतु त्यानंतर व्यवसायावरून यांच्यात बेबनाव निर्माण झाला त्यातूनच हत्याकांडातील घडल्याचे सांगण्यात येते. महत्वाचे म्हणजे सुरज बहुरिया यांची हत्या त्यांच्या जन्मदिनीचं करण्यात आली होती. हत्येनंतर सुरज बहुरिया या यांच्या प्रेतयात्रेमध्ये हजारोच्या संख्येने त्यांच्या चाहत्यांनी केलेली गर्दी हा चर्चेचा विषय होता.
घटनेच्या दिवशी सूरज हा आपल्या मित्रांसोबत शहरातील अरेबिक हॉटेलमध्ये गेला होता. त्यानंतर आरोपी अमन अंदेवार, अविनाश बोबडे व बादल हरणे हे तिघे मोटार सायकलने चक्कर मारून हॉटेलमध्ये असल्याची शहानिशा केली. या तिघांना बघितल्यानंतर सूरजला संशय आला. त्यामुळे सूरज हा आपल्या साथीदारांसह हॉटेलमधून बाहेर पडला. मित्र रजिक याच्या एमएच ३४ एएम १९५८ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातील चालकाच्या सीटवर बसला. यावेळी प्रणय सैदल, अल्फ्रेड अन्थोनी हे दोघे दुचाकीने तेथे आले. त्यानंतर अल्फ्रेड अन्थोनी याने आपल्या जवळील पिस्टलने सूरजवर गोळ्या झाडल्या. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने बल्लारपूरसह जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली होती. त्यानंतर पोलिसांनी अमन आनंद अंदेवार (वय २९, रा. डॉ. झाकिर हुसैन वॉर्ड बल्लारपूर), अविनाश उमाशंकर बोबडे (वय २९, रा. गांधी वॉर्ड बल्लारपूर), प्रणय उर्फ गोलू राजू सैदल (वय २२, रा. श्रीराम वॉर्ड बल्लारपूर), अल्फ्रेड लॉग्रस अॅन्थोनी (वय १९, रा. सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर), बादल वसंत हरणे (वय १९, रा. श्रीराम वॉर्ड, बल्लारपूर), यासीन फारूख सिद्दीकी (वय ३१, रा. सुभाष वॉर्ड बल्लारपूर), मो. शादाब अब्दुल रऊफ शेख (वय ३१, रा. सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर), अक्षय उर्फ फिरू रामनरेश खंगर (वय २०, रा. सुभाष वॉर्ड बल्लारपूर) या नऊ जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, मुख्य आरोपी आकाश उर्फ चिन्ना आनंद अंदेवार तेंव्हापासून फरार होता. महत्त्वाचे म्हणजे या हत्याकांडात सामील आरोपी हे एकमेकांच्या संपर्कातील व मित्रमंडळी होती परंतु व्यवसायातील द्वेषामुळे हे हत्याकांड घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे बल्लारपूरात टायगर व लॉयन ग्रुप सक्रीय झाले होते.या हत्याकांडानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा व दारू तस्करी किती खोल प्रमाणात रुजली आहे, यावर चर्चा सुरू होती. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी तसेच पोलीस विभागाच्या व एलसीबी च्या निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यानंतर बाबासाहेब खाडे यांनी एलसीबी च्या निरीक्षकाचा नुकताच पदभार सांभाळला. फरार आरोपी अंदेवार याला अटक करण्यात एलसीबी पथकाला यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.