“आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी पण त्यात सहभागी होईल” – नितीन राऊत

Share This News

मुंबई – दलित मागासवर्गीयांचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. दलित मागासवर्गीय यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा, मी ही त्यात सहभागी होईल, असं थेट आवाहन राऊत यांनी अनुसूचित जाती-जमातीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.नितीन राऊत यांच्या या आवाहनामुळे महाविकास आघाडीमधील कुरबुर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसून येत आहे. मंत्रालयातील काही झारीतील शुक्राचार्य कुणाच्यातरी दबावाखाली येऊन दलित मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी अडवणूक करत आहेत आणि पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यामुळे, त्यांच्या घरावर मोर्चा काढा, मी पण या मोर्चात सहभागी होईल. असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांतर्गत कुरबुरी गेल्या अनेक दिवसांपासून दिसून येत असताना त्यात आता नितीन राऊत यांच्या या वक्तव्याने आणखी भर पडली आहे. दलित मागासवर्गीय समाजाच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दलित मंत्र्यांकडे या समितीचे अध्यक्षपद देण्याऐवजी अजित पवारांकडे देण्यात आल्याने आधीच दलित समाज नाराज होता. त्यातच या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने राऊत यांनी सत्तेत असूनही थेट अजित पवारांच्या घरावरच मोर्चा काढण्याचं आवाहन केल्यानं नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.अजित पवारांच्या समितीने भाजप सत्तेत असताना काढलेला 2017 चा जीआर रद्द करण्याची शिफारस केली. तरीही योग्य तो निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका सक्षमपणे मांडण्यासाठी योग्य ती माहिती गोळा करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, या समिती नेमणुकीचा जीआर मंत्रालयातील काही झारीतील शुक्राचार्य कुणाच्यातरी दबावाखाली येऊन निघू देत नसल्याचा आणि अडवणूक करत असल्याचा आरोप थेट मंत्रालयातीलच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. यानंतर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.