तारापूर एमआयडीसीतील कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू, सहा जखमी

पालघर, ४ सप्टेंबर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जखारिया लिमिटेड या टेक्सटाइल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू, सहा जण जखमी, तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. कारखान्यातील बॉयलरमुळे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. आग लागली तेव्हा कारखान्यात आठ कामगार काम करीत होते. या स्फोटात मिथिलेश राजवंशी यांचा मृत्यू झाला आहे. छोटेलाल सरोज नावाचे कामगार बेपत्ता आहेत. तर जखमींमध्ये गणेश पाटील, अरविंद यादव, मुरली गौतम, अमित यादव, मुकेश यादव आणि उमेश राजवंशी या कामगारांचा समावेश आहे. जखमींवर बोईसरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. स्फोटाच्या आवाजाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.