नागपुरात गुंडाकडून शिक्षिकेला केसांना धरुन रस्त्यावर ओढत विनयभंग, विरोध करणाऱ्या पोलिसांनाही मारहाण

नागपूर : मेरा नाम याद रखना.. घर में घुस के मारेंगे, पोलीस कि कुछ नहीं चलती, हे नागपुरातील एका गावगुंडाचे शब्द आहेत. भर रस्त्यात शिक्षिकेची छेड काढल्यानंतर तिला केसांना पकडून रस्त्यावर ओढल्यानंतर आणि रोखायला आलेल्या वाहतूक पोलिसांचीही धुलाई केल्यानंतर हे एका गावगुंडाचे शब्द आहेत. त्यामुळे नागपुरातकायद्याचे राज्य आहे की गुंडाची मग्रुरी असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.

राजकिरण राजहंस नावाच्या या गावगुंडाने पोलिसांच्या उपस्थितीत एका शिक्षिकेला धमकावले आहे. नवीन वर्षाच्या संध्याकाळी नागपूरच्या शांतीनगर परिसरात राहणारी एक शिक्षका आपल्या कुटुंबियांसह बालोद्यान फिरायला आली होती. संध्याकाळी सर्व कुटुंबीय घरी परत जात असताना त्यांच्या दुचाकीने काही गुंडाच्या दुचाकीला कट लागला. गुंडांनी लगेच आपल्या बाईकने शिक्षिका आणि तिचा भाऊ बसलेल्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. राजभवनाच्या मागील गेटजवळ त्यांना अडवत शिवीगाळ करणे सुरू केले. प्रचंड नशेत असलेल्या एका गुंडाने थेट शिक्षिकेच्या अंगावर हात घालत तिला रस्त्यावर केस पकडून ओढले.

गावगुंडांना रोखणाऱ्या पोलिसांनाही मारहाण
शिक्षिकेच्या कुटुंबातील पुरुष मंडळीने विरोध करताच तिघे गुंड हाणामारी वर आले. शिक्षिकेच्या कुटुंबाने मदतीसाठी आरडाओरड करत असताना जवळून जाणारे वाहतुक पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला असता गुंडांनी वाहतूक पोलिसांवर हल्ला चढवत त्यांची धुलाई केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. गिट्टीखदान पोलीस स्टेशन वरून अतिरिक्त पोलीस पोहचल्यावर तिन्ही गुंडांना आवरणे शक्य झाले. दरम्यान, हे गुंड पोलिसांच्या समोरच शिक्षिकेला आणि तिच्या भावाला घरात घुसून मारण्याची धमकी देत होते. पोलीस आमचे काही बिघडू शकत नाही. त्यांचं काही चालत नाही, असे मग्रूरीचे शब्द हे गुंड वापरत होते.

गिट्टीखदान पोलीस स्टेशन मधून आलेल्या पोलिसांनी मिळून या गुंडाना आवरले आणि पकडून पोलीस स्टेशनला नेले. पीडित शिक्षिकेच्या तक्रारींवर पोलिसांनी राजकिरण राजहंस आणि राकेश राऊत वर कलम 354 अन्वये छेडखानी, विनयभंगाचा गुन्हा नोंदवत अटक केली आहे. या गुंडांचा एक सहकारी फरार झाला आहे.

नागपुरात महिला असुरक्षित?
गेल्याच महिन्यात एकतर्फी प्रेमातून नागपुरात एका माथेफिरूने तरुणीच्या घरात घुसून तिच्या लहान भावाची आणि वृद्ध आजीची हत्या केली होती. तर नांगरवान परिसरात एका परिचारिकेवर माथेफिरूने चाकू हल्ला करत तिला गंभीर जखमी केले होते. त्यामुळे नागपुरातील रस्त्यांवर महिलांच्या बाबतीत गुन्हे राजरोसपणे का घडत आहेत. गावगुंडांना पोलिसांची भीती का उरली नाही असे सवाल या घटनेने निर्माण झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर शिक्षिकेचं कुटुंब प्रचंड दहशतीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.