शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

ठाणे, 5 सप्टेंबर : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून हातगाड्या, टपऱ्या तसेच स्टॉल जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.

या कारवाईतंर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील आलोक हाँटेल, गावदेवी, तीन हात नाका, राममारुती रोड, तलावपाळी दुकानांसमोरील सामान उचलण्यात आले तसेच रस्त्यावरील फेरीवाले हटवून ४ बॅग, ५ पुतळे चायनीज गाळा, १ ठेले, २ फळांच्या टोपल्या तर स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका, कोर्ट नाका येथील ठेले ७ कटलरी बॉक्स, ९ फळांच्या पाट्या ११ जप्त करण्यात आल्या.

माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील तुर्फेपाडा ब्रम्हांड, हिरानंदानी चौक ते श्रीमा शाळेच्या परिसरातील कारवाई दरम्यान ४ स्टॉल, ३ टपरी, २ प्लास्टीक पेपर शेड व ५ बँनर पोल तोडण्यात आले. तुर्फेपाड़ा येथील अनधिकृत प्लास्टिक व बांबूच्या सहाय्याने उभारण्यात आलेले १ शेड तोडण्यात आले. हिरानंदानी इस्टेट येथील आर्केडिया शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानबाहेर लावण्यात आलेले ४ लोखंडी स्टॉल, २ फ्रिज, १ वॉटर कुलर तसेच बस स्टॉप मागील दुकान बाहेर लावण्यात आलेली १ हातगाडी व १ उसाचा रसाचा चरका तसेच हिरानंदानी रोड वरील भंगार व जनरेटर मशीन जप्त करण्यात आले.

दिवा प्रभाग समितीमधील दिवा स्टेशन रोड, दिवा आगासन रोड, दातिवली रोड, मुंब्रादेवी कॉलनी व शीळ फाटा रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये २८ हातगाड्या, ०३ लोखंडी स्टॉल, ०१ जाळी पिंजरे , ०६ लाकडी टेबले जप्त करून जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. तसेच मुंब्रा प्रभाग समितीमधील गुलाब पार्क व तनवर नगर नाका, वाय जंक्शन, कौसा येथील फेरीवाले, हातगाडीवाले यांना हटविण्यात आले. यासोबतच कळवा पश्चिम, स्टेशन रोड परिसर, खारेगाव भाजी मार्केट परीसर, भास्कर नगर , घोलाई नगर, शिवशक्ती नगर येथील रस्त्यावरील अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाले तसेच किरकोळ विक्रेते यांच्यावर कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले.

सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर, अलका खैरे आणि सागर साळुंखे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.