टर्मिनस कागदावर, ट्रक रस्त्यावर

Share This News

चार वर्षे उलटूनही उभारणीला मुहूर्त मिळेना

ठाणे : ठाण्यातून ये-जा करणारी अवजड वाहने उभी करण्यासाठी मॉडेला चेकनाक्याजवळील भूखंडावर ट्रक टर्मिनस उभारण्याची महापालिकेची योजना गेल्या चार वर्षांपासून कागदावरच आहे. या परिसरात मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच या मार्गालगत ट्रक व अवजड वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे.

ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर असलेल्या मॉडेला चेक नाक्याजवळ गेल्या काही वर्षांपासून वाहतूककोंडी होत आहे. या मार्गावरून मुंबई, वागळे आणि तीन हात नाक्याच्या दिशेने वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून मेटो प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून त्यासाठी या ठिकाणी लोखंडी पत्रे लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. वाहन संख्येच्या तुलनेत हा रस्ता अपुरा पडू लागल्याने मॉडेला चेक नाक्यापासून तीन हात नाक्यापर्यंत वाहतूककोंडी होत आहे. मध्यंतरी ही कोंडी कमी करण्यासाठी तीन हात नाका येथील सिग्नलच्या वेळेत बदल करण्यात आला. यामुळे तीन हात नाका सिग्नल येथील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी झाली असली तरी मॉडेला चेक नाका येथील कोंडी तशीच आहे. या मार्गालगत गेल्या अनेक वर्षांपासून ट्रक उभे केले जात असून या ट्रकमुळे कोंडीत भर पडत आहे. चार वर्षांपूर्वी मेट्रोचे काम सुरू झाले नव्हते. त्याचवेळेस रस्त्यालगत उभे करण्यात येणाऱ्या ट्रकसाठी टर्मिनस उभारण्याची मागणी ठाणे शहर मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली होती. येथील मॉडेला मिलच्या सुविधा भूखंडावर ट्रक टर्मिनस उभारण्याची मागणी त्यांनी केली. त्यास प्रशासनाने होकार देऊन सुविधा भूखंडावर ट्रक टर्मिनस उभारणीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र गेल्या चार वर्षांत या टर्मिनसचे काम अद्याप सुरूच होऊ शकलेले नाही. त्याचा फटका आता शहरातील वाहतुकीला बसू लागला आहे. या ठिकाणी ट्रक टर्मिनस तयार करण्यात आले असते तर, पाचशे वाहने उभी करण्याची व्यवस्था निर्माण झाली असती. तसेच ट्रक उभारणीसाठी हक्काची जागा निर्माण झाली असती आणि त्यामुळे रस्त्यालगत होणाऱ्या बेकायदा पार्किंगला आळा बसून येथील वाहतूक सुरळीत राहिली असती. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे हे ट्रक टर्मिनसचे काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे महापालिकेचे नगर अभियंता रवींद्र खडताळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

‘लोकसहभागातून टर्मिनस उभारू’

मॉडेला नाक्याजवळील भूखंड ट्रक टर्मिनससाठी उपलब्ध असल्याचे पत्र प्रशासनाने चार वर्षांपूर्वी दिले होते. त्यानुसार येथे ट्रक टर्मिनस उभारणीसाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, हे काम अद्याप सुरूच होऊ शकलेले नाही. ठाणे महापालिकेने लवकर उभारले नाही तर लोकसहभागातून ते उभारू, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. तसेच ट्रक टर्मिनस अद्याप का उभारले नाही, अशा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारत ट्रक टर्मिनसऐवजी ‘भूखंडाचे श्रीखंड’ करू नका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.