ठाणे – रस्ता रुंदीकरणाला विरोध करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे महापौरांचे निर्देश

ठाणे, 8 सप्टेंबर, शहरातील हाजूरी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामामधील तांत्रिक अडचणी तात्काळ सुरू करून रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच हाजुरी रस्ता रुंदीकरण तातडीने करणे गरजेचे असून या कामास विरोध करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी प्रभाग क्र.१९ मधील हाजूरी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली.

हाजूरी येथे ६० मीटर लांबीच्या रस्ता रुंदीकरणाचे काम प्रस्तावित होते. परंतु नागरिकांचे पुनर्वसन व काही तांत्रिक अडचणी असल्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सदरचा रस्ता ४५ मीटरच करण्यात आला आहे. त्यानुसार रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. परंतु स्थानिक काही नागरिकांच्या विरोधामुळे तसेच गटर्स व ट्रेनेजच्या कामासंबंधित तांत्रिक अडचणीमुळे सदरचे काम थांबले होते. आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी या कामाची पाहणी करून सर्व तांत्रिकबाबी तात्काळ दूर करत जलदगतीने काम सुरु करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता लवकरात लवकर सुरु करणे महत्वाचे असल्याने या कामाला विरोध करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.