19 वर्षांची तरुणी बनणार एका दिवसाची CM, सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील दिली मंजुरी

Share This News

उत्तराखंडमधील हरिद्वारची सृष्टी गोस्वामी (Srishti Goswami) एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांच्या रुपात दिसणार आहे. 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त सृष्टीला एका दिवसाची मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हरिद्वार, 23 जानेवारी: उत्तराखंडमधील हरिद्वारची सृष्टी गोस्वामी (Srishti Goswami) उद्या म्हणजेच 24 जानेवारी रोजी एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांच्या रुपात दिसणार आहे. 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय कन्या दिवस असतो, त्यानिमित्त सृष्टीला ही संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत (Chief Minister Trivendra Singh Rawat) यांच्या मंजुरीनंतर सृष्टी एका दिवसाची मुख्यमंत्री (One Day CM) बनणार आहे. देशामध्ये ही अशी घटना पहिल्यांदा घडत आहे की, मुख्यमंत्री असताना देखील कुणीतरी एका दिवसाचा मुख्यमंत्री बनणार आहे. त्यानंतर ही बातमी वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होते आहे.

यादिवशी हरिद्वारच्या बहादुराबाद ब्लॉकमधील दौलतपूर गावाचे नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाणार आहे. सृष्टी गोस्वामी कन्या दिवसानिमित्त एकदिवसीय मुख्यमंत्री होणार आहे. यावेळी सृष्टी एक मुख्यमंत्री म्हणून विकास कामांचा आढावा घेणार आहे. शिवाय 12 विभागातील अधिकारी त्यांच्या विभागातील योजनांबाबतचे 5-5 मिनिटांचे प्रेझेंटेशन तिच्यासमोर करतील.

सृष्टीचे वडील प्रवीण पुरी दौलतपुरात किराणा दुकान चालवतात, तर सृष्टीची आई सुधा गोस्वामी गृहिणी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी 2018 मध्ये बाल विधानसभा संघटनेत बालिका आमदार म्हणूनही सृष्टी गोस्वामीची निवड झाली होती. सृष्टीचे वडील प्रवीण पुरी म्हणाले की, आज त्यांना खूप अभिमान वाटत आहे की त्यांची मुलगी अशा ठिकाणी पोहोचली आहे जिथे अनेक लोकांनी पोहोचण्याचे स्वप्न पाहिले आहे. असे संपूर्ण देशात पहिल्यांदाच होत आहे की, एका दिवसाची का होईना माझी मुलगी मुख्यमंत्री होणार आहे.

सृष्टीचे आई, सुधा गोस्वामी सांगतात की, तिने गाठलेला हा मैलाचा दगड असून, देशातील प्रत्येक पालकांना असे सांगेन की मुलींना प्रगती करण्यापासून कधीही रोखू नये. सृष्टी गोस्वामी सध्या रुड़कीच्या बीएसएम पीजी महाविद्यालयातून बीएससी शेती करत आहे. ती म्हणाली की, तिची प्राथमिकता एक दिवसाची मुख्यमंत्री म्हणून अशी असेल की, आतापर्यंतच्या विकासकामांचा आढावा घेईल. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना काही सूचना देणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.