नागपूर : आरोपींनी चार ठिकाणी चाकूचा धाक दाखवून केली  लूटमार

दारूच्या नशेत धुंद  दोन आरोपींनी मानेवाडा चौक ते बेलतरोडी रोड दरम्यान चार ठिकाणी चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. अजनी पोलिसांच्या डीबी पथकाने मिळालेल्या माहितीवर त्वरित कारवाई करून बेलतरोडी रोडवरून आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५.३0 ते ६ वाजताच्या दरम्यान एका बाईकवर दोन आरोपी मानेवाडा चौकाजवळील हॅपी फूड येथे गेले. तेथे उभ्या असलेल्या मुलीला चाकूचा धाक दाखवून घाबरविले. दोघेही आरोपी नशेत होते. त्यापैकी एकाजवळ लहान चाकू होता. त्याचा धाक दाखवित तो हॅपी फूडमध्ये घुसला. तेथील काच फोडत आरोपी आत घुसला. तेथे त्याने ८ हजार रु. नगदी आणि मोबाईल चोरले. त्याला पकडण्याचा तेथील लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. तेथून आरोपी मानेवाडा चौकातील एच.पी. पेट्रोलपंप येथे लूट करण्यासाठी गेले. पण, तेथे त्यांना लूट करता आली नाही.  तोवर अजनी पोलिसांना घटनेची माहिती लोकांनी दिली. त्यामुळे अजनी पोलिसांचे डीबी पथक आरोपीच्या शोधासाठी निघाले. आरोपींना पेट्रोलपंप लुटणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी तंदूर सावजी भोजनालयाकडे धाव घेतली. तेथेही त्यांनी लुटपाटीचा प्रयत्न केला. तेथून आरोपी ओंकारनगर ते बेलतरोडी मार्गाने दुचाकीने पळाले. अजनी पोलिस ठाण्याचे डीबी पथकही त्यांना शोधत होते. दरम्यान, आरोपींनी रस्त्यात शारदा डेरीवर लूटपाट करण्याचा प्रयत्न केला.तेवढय़ात डीबी पथक आल्याने आरोपींनी चाकू आणि त्यांची बाईक तेथेच फेकून जंगलाकडे पळ काढला. मात्र, डीबी पथकाला त्यांना पकडण्यात यश मिळाले.  विशेष म्हणजे घटना घडल्याच्या एका तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.