जिल्हा रुग्णालयात चार तास मृतदेह ठेवून ठिय्या

भंडारा
जिल्हा सामान्य रुग्णालय ९ जानेवारी रोजी घडलेल्या जळीतकांडाने देशात चर्चेत आले होते. आता पुन्हा एका युवकाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने या रुग्णालयाची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे. विष प्राशन करणार्‍या युवकाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यानंतर आज मृतकाच्या कुटुंबीयांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या कक्षाजवळील प्रवेशद्वारासमोर मृतदेह ठेऊन चार तास ठिय्या दिला. त्यानंतर अधिकार्‍यांकडून आश्‍वासन मिळाल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रशेखर तुमसरे (२८) रा. गोंडसावरी ता. लाखनी असे मृतकाचे नाव आहे. चंद्रशेखरने १९ जानेवारी रोजी उंदिर मारण्याचे औषध प्राशन केले होते. मध्यरात्री १ वाजता तो अस्वस्थ झाल्याने कुटुंबियांनी त्याला त्याचरात्री लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचार केल्यानंतर चंद्रशेखरला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर कोणताही उपचार करण्यात आला नसल्याचा आरोप चंद्रशेखरच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान चंद्रशेखरची प्रकृती अधिकच ढासळल्याने २0 जानेवारी रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास चंद्रशेखरला नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. घाबरलेल्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिका मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी चंद्रशेखरची प्रकृती अधिकच खालावली. काही वेळातच त्याची हालचाल बंद झाली. त्यावेळी तिथे हजर असलेल्या नर्सने डॉक्टरांना बोलविले. डॉक्टरांनी तपासून चंद्रशेखरला मृत घोषित केले.
भंडारा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी चंद्रशेखरच्या पोटातील विषारी पाणी न काढता फक्त सलाईनवर ठेवले. त्याला वेळेवर उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता. यासाठी दोषी असलेल्या डॉक्टर व जिल्हा शल्यचिकीत्सकांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज सकाळी १0 वाजतापासून चंद्रशेखरच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या कक्षाजवळील प्रवेशद्वारासमोर आणून ठेवला होता. त्यानंतर पोलिसांनी चंद्रशेखरच्या भावाचे बयान नोंदवून घेतले. अधिकार्‍यांनी आश्‍वासन दिल्यानंतर दुपारी २ वाजता मृतदेह उचलण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.