अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढून बलात्कार

पाकिस्तानात माणुसकीला लाजवणारी घटना

इस्लामाबाद : पाकिस्तानात हैवानालाही लाजवणारी घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढत तिच्यावर बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. 13 ऑगस्टला पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु असताना आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थट्टा जिल्ह्यातील असरफ चांडीओ गावात ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार असरफ चांडीओ गावात राहणार्‍या 14 वर्षांच्या मुलीचा 12 ऑगस्टला तापाने फणफणून मृत्यू झाला होता. दुसर्‍या दिवशी तिच्या मृतदेहाचे गुलामुल्लाह कबरस्तानामध्ये विधिवत दफन करण्यात आले होते. मात्र त्या भागातील एका गुंडाने त्याच रात्री तिचा मृतदेह कबरस्तानातून बाहेर काढला. त्यापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडाझुडपात तिचे शव नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा मृतदेह तिथे झाडीत टाकून तो पसार झाला. आरोपीचे नाव रफीक चांडीओ आहे.
तरुणीची कबर खणली असून आत मृतदेह नसल्याचे दुसर्‍या दिवशी काही जणांच्या ध्यानात आले. याची माहिती तातडीने तिच्या वडिलांना देण्यात आले. तिचे वडील आणि गावकरी घटनास्थळी गेले. पोलिसांना बोलावून मृतदेह शोधण्यात आला. काही वेळातच जवळच्या झाडीत तरुणीचा मृतदेह सापडला. मृतदेहाला घातलेले कपडे अस्ताव्यस्त होते. पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटला पाठवला असता डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याच्या शंकेला अधिकृत दुजोरा दिला.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनी पोलिसांविरोधातही नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जी केल्याचा आरोप केला जात होता. आरोपी गुंड रफीक चांडीओ याला तुरुंगात टाकलं तर तो पैसे देऊन बाहेर येईल, त्यापेक्षा त्याला थेट गोळी घाला, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. पोलिसांनी तातडीची पावलं टाकत आरोपीची शोध मोहीम हाती घेतली. छापेमारी करताना रफीकने पोलिसांवरही गोळी झाडली. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत पोलिसांनी त्याचा खात्मा केला. आरोपी गुंड रफीक चांडीओ हा सराईत गुन्हेगार होता, त्याने गेल्या दहा वर्षांपासून लूट, दरोडेखोरी असे गुन्हे केले होते, यावेळी त्याने माणसाच्या कल्पनेपलिकडचे कृत्य केले, तो मानवी शरीरातील हैवान होता, असे थट्टा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी डॉ. इमरान खान म्हणाले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.