दहावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कोर्टाची सरकारला फटकार

Share This News


मुंबईः इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु असून कोरोना संसर्गाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान करू शकत नाही, याशब्दात न्यायालयाने सरकारला फटकार लगावली.
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अलिकडेच घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका माजी सिनेट सदस्याने याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला फटकार लगावली. दहावीची परीक्षा रद्द करून बारावीची परीक्षा घेणार असल्याचे सरकार म्हणत आहे. हा नेमका काय गोंधळ आहे, या शब्दात न्यायालयाने सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. शालेय शिक्षणानंतरची दहावीची परीक्षा महत्वाची असते व ती रद्द करून शिक्षण व्यवस्थेचे नुकसान केले जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले. बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असताना दहावीची परीक्षा सरकारने रद्द का करावी, हा भेदभाव कशासाठी केला गेला, असे प्रश्नही न्यायालयाने सरकारपुढे उपस्थित केले. यासंदर्भात राज्य सरकारसह सर्वच मंडळांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. दहावीचा निकाल कसा लावणार, याबद्धल इतर मंडळांनी काय तयारी केली आहे, राज्य मंडळ परीक्षा रद्द करून गप्प का बसले, असे अनेक प्रश्न न्यायालयाने गुरुवारी उपस्थित केलेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.