दिल्ली बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्लाच, ‘मोसाद’चे पथक राजधानीत दाखल होण्याची शक्यता

दिल्लीमध्ये शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाच्या तिसऱ्याच दिवशी इस्त्रायलच्या दुतावासाजवळ बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली. यानंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हा बॉम्बस्फोट दहशतवाद्यांनीच घडवून आणल्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचे विधान इस्त्रायलचे हिंदुस्थानमधील राजदूत रॉन मनका यांनी केले आहे. त्यामुळे या बॉम्बस्फोटाचा तपास करण्यासाठी इस्त्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’चे पथक राजधानीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना रॉन मलका म्हणाले की, आम्ही गेल्या काही आठवड्यांपासून हाय अलर्टवर होतो, त्यामुळे या राक्षसी हल्ल्याचे आम्हाला कोणतेही आश्चर्य वाटलेले नाही. तुर्तास हल्ल्यासंबंधी अधिक माहिती गोळा केली जात असून हा दहशतवादी हल्लाच होता असा पुरावा आमच्याकडे असल्याचेही ते म्हणाले. तसेच 2012 पासून जगभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची माहिती आम्ही मिळवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘मोसाद’चे पथक राजधानीत?

जगभरात नावाजलेली गुप्तचर संस्था ‘मोसाद’चे पथक दिल्लीमध्ये दाखल होण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत इस्त्रायल आणि हिंदुस्थानमध्ये ‘एनएसए’ स्तरावरील चर्चा झाली असून त्यानंतर इस्त्रायल सरकारने मोसादचे पथक दिल्लीत पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच या हल्ल्यामागे इराणच्या ‘इस्लामीक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) हात असल्याचे बोलले जात आहे.

दिल्ली पोलिसांनी केली इराणी नागरिकांची चौकशी

दरम्यान, बॉम्बस्फोटानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाली असून ‘एनएसजी’चे एक पथक दिल्लीतील इस्त्रायल दुतावासावर पोहोचले आहे. तसेच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजधानीमध्ये राहणाऱ्या काही इराणी नागरिकांचीही चौकशी केली आहे. यातील काहींचा व्हिसा संपल्याचेही निदर्शनास आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.