सक्रिय करोनाबाधितांची संख्या घटली! अनेक दिवसानंतर संख्या दहा हजारांहून खाली

२४ तासांत २३ मृत्यू; ८९८ नवीन रुग्ण

नागपूर : आज मंगळवारी जिल्ह्य़ात अनेक दिवसांनी करोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या दहा हजारांहून खाली आली. याशिवाय जिल्ह्य़ात २४ तासांत २३ बाधितांचा मृत्यू तर ८९८ नवीन बाधितांची नोंद झाली.

जिल्ह्य़ातील एकूण ९ हजार ६५६ सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील ६ हजार ४२८ तर ग्रामीणच्या ३ हजार २२८ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शहरात २४ तासांत १५ , ग्रामीण ३, जिल्ह्य़ाबाहेरील ५ असे एकूण २३ मृत्यू नोंदवले गेले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या १ हजार ९४९, ग्रामीण ४६७, जिल्ह्य़ाबाहेरील २६६ अशी एकूण २ हजार ६८२ वर पोहचली आहे.

शहरात २४ तासांत ५५६, ग्रामीण ३३७, जिल्ह्य़ाबाहेरील ५ असे एकूण ८९८ नवीन रुग्णांची भर पडली. २५ सप्टेंबर २०२० रोजी जिल्ह्य़ातील सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ७९१ नोंदवण्यात आली होती. त्यापूर्वी सातत्याने रोज जिल्ह्य़ात मोठय़ा संख्येने नवीन बाधितांची नोंदही होत होती, हे विशेष.

बधिरता हे सुद्धा करोनाचे नवे लक्षण

करोनाची लक्षणे दिवसेंदिवस बदलत आहेत. सुरुवातीला ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वास घ्यायला त्रास अशी लक्षणे बाधितांमध्ये दिसत होती. आता चव जाणे, वास न येणे, छातीत दुखणे, अतिसार, थकवा अशा लक्षणांसह बधिरता हे लक्षणसुद्धा काही रुग्णांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे चाचणी करून प्रत्येकाने काळजी घ्यावी, असा सल्ला आयएमएच्या सहसचिव तथा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सुषमा ठाकरे आणि कन्सल्टंट अ‍ॅनेस्थेसियोलॉजिस्ट अँड पेन फिजिशियन डॉ. उमेश रामतानी यांनी दिला. महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोविड संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मंगळवारी डॉ. सुषमा ठाकरे आणि डॉ. उमेश रामतानी यांनी ‘करोनातून

बरे झाल्यानंतर घ्यावयाची काळजी’ यावर मार्गदर्शन केले. गृहविलगीकरणाचा १७ दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुन्हा करोना चाचणी करण्याची गरज नाही. करोनामधून बरे झाल्यानंतर अनेकांना महिनाभराने लक्षणे दिसतात तर अनेकांची लक्षणे तीन-तीन महिन्यांपर्यंत कायम असल्याचे दिसून आले आहे. करोना झाल्यानंतर अनेकांना सांधेदुखी, मांसपेशींचे दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, रात्री झोप न येणे, झोपेतून उठून बसणे, नैराश्य, वैफल्याची भावना, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर आजारांचा शिरकाव, नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदयविकाराचा झटका, असे अनेक त्रास जाणवत आहेत. त्यामुळे यासाठी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही ते म्हणाले.

२,७८३ बाधित रुग्णालयांत

शहरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सध्या २ हजार ७८३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने आता शासकीय व खासगी रुग्णालयांत काही प्रमाणात खाटा उपलब्ध असल्याचे चित्र आहे. सध्या शहरात सुमारे ५ हजार ९७५ बाधितांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

करोनामुक्तांचा आलेख ८५ टक्क्यांवर

जिल्ह्य़ात २४ तासांत १ हजार १३३, ग्रामीण २९२ असे एकूण १ हजार ४२५ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील करोनामुक्तांची संख्या ५६ हजार ८९८, ग्रामीण १३ हजार ८६९ अशी एकूण ७० हजार ७६७ वर पोहचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ८५.१५ टक्के नोंदवण्यात आले आहे.

केवळ ११.५३ टक्के अहवाल सकारात्मक

जिल्ह्य़ात २४ तासांत ४ हजार ५१३ तर ग्रामीणला ३ हजार २७२ अशा एकूण ७ हजार ७८५ आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ ११.५३ टक्के अहवाल सकारात्मक आल्याने आरोग्य विभागाला आंशिक दिलासा मिळाला आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास या आजाराच्या कमी होण्याबाबत अधिकृत काही सांगता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विदर्भातील

(०६ सप्टेंबर) मृत्यू

जिल्हा मृत्यू

नागपूर २३

वर्धा ०४

चंद्रपूर ०३

गडचिरोली ००

यवतमाळ ०९

अमरावती ००

अकोला ०२

बुलढाणा ०३

वाशीम ००

गोंदिया ००

भंडारा ०७

एकूण ५१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.