देशात कोरोनाबाधित व मृत्यूंच्या संख्येतही घट!

Share This News

दिल्लीसह नागपुरात मुलांवरील लस चाचणी

नवी दिल्ली : दोन ते अठरा वयोगटातील बालकांसाठीच्या कोरोनावरील लसीच्या चाचणीला देशात विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात नागपूरमध्ये रविवारपासून ही चाचणी सुरू झाली. त्यापाठोपाठ सोमवारी दिल्ली एम्समध्ये ही चाचणी सुरू करण्यात आली आहे. पहिला टप्पा १२ ते १८ वर्षे वयोगटासाठी आहे.
भारत बायोटेक कंपनीने बालकांसाठीच्या कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. पाटणा एम्स रुग्णालयात या लसीच्या परीक्षणाला याआधीच सुरुवात करण्यात आली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्समध्ये ५२५ जणांना ही लस दिली जाणार आहे. ट्रायलदरम्यान इंट्रामस्क्युलर पद्धतीने दोनवेळा ही लस देण्यात येईल, अशी माहिती एम्स रुग्णालयातील सूत्रांनी दिली. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील बालकांसाठीच्या लसीच्या परीक्षणाला १२ मे रोजी परवानगी दिली होती. कोरोनाचा मोठा फटका अद्याप लहान मुलांना बसलेला नसला तरी कोरोना विषाणू वारंवार आपले रूप बदलत असल्याने व भविष्यात त्यामुळे लहान मुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने लस विकसित करणे गरजेचे बनले असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
देशात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत मोठी घट होत असून कोरोनामुक्त होणार्‍यांच्या संख्येत आता वाढ होत आहे. सोमवारी प्रथमच दैनंदिन करोनाबाधितांची संख्या एक लाखाच्याही खाली आली आहे.
गेल्या २४ तासांत देशामध्ये ८६ हजार ४९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एका दिवसात एक लाखाहूनही कमी बाधित आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर देशातल्या कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आजही बाधितांच्या संख्येपेक्षा जास्तच आहे. देशात काल दिवसभरात एक लाख ८२ हजार २८२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या १३ लाख ३ हजार ७0२ झाली आहे.
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. काल दिवसभरातल्या देशातल्या मृत्यूंची संख्या २,१२३ इतकी आहे. त्यामुळे देशातल्या करोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता तीन लाख ५१ हजार ३0९वर पोहोचली आहे.
देशात लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. गेल्या २४ तासात देशातल्या ३३ लाख ६४ हजार ४७६ नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी ३0 लाख ३८ हजार २८९ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तर दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या तीन लाख २६ हजार १८७ इतकी आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील सवार्चे मोफत लसीकरण करण्याची घोषणा सोमवारी केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.