जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने घट कायम

नागपूर

एकीकडे सातत्याने देशातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढत चालले असून, ते आता ९४ टक्क्यांच्या पलीकडे पोहोचले आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात याउलट परिस्थिती आहे. जिल्ह्यात दिवाळीपूर्वीपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. मात्र, दिवाळीनंतर यात सातत्याने घट पहायला मिळत आहे. आजघडीला जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे कालच्याही तुलनेत घटून ते आता ९१.६९ टक्क्यांवर आले आहे. जेव्हाकी बाधितांची संख्या ही दररोजच वाढत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये बाधितांसोबतच बळींचीही संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी यापूर्वीच भाकित केले होते, की कोरोनाची दुसरी लाट येणार. जिल्ह्यात सातत्याने होत असलेली रुग्णसंख्येतील वाढ ही ते भाकित खरे ठरत चालल्याचेच द्योतक असल्याचे दिसून येत आहे. आज रविवारी शनिवारच्याही तुलनेत कमी चाचण्या होऊनदेखील रुग्णसंख्या ही शनिवारच्या तुलनेत रविवार २0 डिसेंबरला अधिक नोंदविल्या गेली आहे. शनिवारी जिल्ह्यात केवळ ३९८ बाधितांची नोंद करण्यात आली होती, तेव्हा ४३१६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर आज रविवारला ४१३८ चाचण्या होऊनदेखील ४३३ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. रविवारी नोंदविण्यात आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३४८, ग्रामीणचे ८२ व इतर जिल्ह्यातील तीन जणांचा समावेश आहे.
यामध्ये रॅपिड अँन्टिजेन तपासणीद्वारे ३६ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. तर खासगी लॅबमधून १६३, एम्समधून ४१, मेडिकलमधून ६८, मेयोतून ९४, माफसूमधून ५, नीरीतून १७ व नागपूर विद्यापीठाच्या विषाणू प्रयोगशाळेतून ९ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २0 हजार ५२ वर पोहोचली आहे.
सध्या जिल्ह्यात ६१३0 सक्रिय रुग्ण आहेत. यातील केवळ १३९६ जणांनाच सौम्य व मध्यम लक्षणे असल्याने ते शासकीय, खासगी रुग्णालयांसोबतच कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये उपचार घेत आहेत. तर लक्षणे नसलेले तब्बल ४७३५ जण हे गृह विलगीकरणात आहेत. तर शहरातील ३, ग्रामीणचे २ व इतर जिल्ह्यातील ३ अशा ८ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ३८४९ वर पोहोचली आहे. यातील ५६९ कोरोना मृतक हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.