लक्षणे असलेल्या रुग्णांची टक्केवारी वाढतेय

Share This News

नागपूर
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायमच आहे. परंतु आता बाधितांची संख्या वाढण्यासोबतच सक्रिय असलेल्या रुग्णांपैकी लक्षणे असलेल्यांचीही टक्केवारीही कायम वाढत आहे. या रुग्णांवर शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. वाढती लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ही आरोग्य प्रशासनाची चिंता वाढविणारी बाब ठरत चालली आहे.
आजघडीला जिल्ह्यात ३९१७ सक्रिय रुग्ण बाहेत. यापैकी जवळपास ३२.७३ टक्के रुग्णांना म्हणजेच १२८२ जणांना सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शहरातील मेयो, मेडिकल, एम्स आदी शासकीय तसेच खासगी रुग्णालये व कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे. तर लक्षणे नसलेले २६३५ रुग्ण हे गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. शनिवार, २ जानेवारी रोजी दिवसभरात नागपूर शहरात ४१३९ व ग्रामीण भागात ८६१ अशा एकूण ५ हजार चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी ७.७ टक्के म्हणजेच ३८४ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यामध्ये शहरातील ३४३, ग्रामीणमधील ३८ व इतर जिल्ह्यातील ३ जणांचा समावेश आहे.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) च्या विषाणू प्रयोगशाळेतून ४८ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. एम्समधून १४, मेयोतून ७१, माफसूच्या प्रयोगशाळेतून ६, रॅपिड अँन्टिजेन तपासणीद्वारे ३३, खासगी लॅबमधून १६५ व नागपूर विद्यापीठाच्या विषाणू प्रयोगशाळेतून ४७ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २४ हजार ५५0 वर पोहोचली आहे. यापैकी ९८६६४ रुग्ण एकटे नागपूर शहरातील आहेत. तर २५0९६ ग्रामीणमधील व ७९0 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६८ टक्क्यांवर
शनिवारी दिवसभरात २६४ जण ठणठणीत होऊन घरी परतलेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख १६ हजार ६८२ वर पोहोचली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६८ टक्क्यांवर आली आहे. तर शहरातून ५ व नागपूर ग्रामीण तसेच इतर जिल्ह्यातील प्रत्येकी ३ अशा ११ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.