पाचही वेळा ओंजळ रितीच, भंडारा अग्नितांडवातील हिरकन्येची कहाणी

भंडारा/गोंदिया : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवात दहा कुटुंबियांनी आपलं सर्वस्व गमावलं. समोर येत असल्या, तरी त्यांच्या दुःखाचा धागा समान आहे. भानारकर कुटुंबासोबत नियतीने अक्षरशः क्रूर थट्टा मांडली. एक-दोनदा नव्हे, तर तब्बल पाच वेळा सोनपावलांनी आलेलं सुख काळाने हिरावून नेलं. चौदा वर्षांच्या संसारत पाच वेळा हिरकन्या भानारकर यांना मातृत्वाची चाहूल लागली, मात्र त्यांची ओंजळ पाचही वेळा रितीच राहिली. (Gondia lady who lost baby Bhandara Hospital Fire fifth time)

हिरालाल आणि हिरकन्या भानारकर यांचे 14 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तेव्हापासूनच दोघांनी आपल्या संसारवेलीवर फूल उमलण्याचे स्वप्न पाहिले. याआधी चार वेळा गरोदर राहिलेल्या हिरकन्या यांना कधीच आपल्या बाळाला हातात खेळवण्याचं सुख लाभलं नाही. एकदा त्यांचा गर्भपात झाला होता, तर तीन वेळा त्यांना मृत बाळ जन्माला आलं.

देव-दवा-दुवा.. सगळं केलं!

हिरकन्या भानारकर वयाच्या 39 व्या वर्षी पाचव्यांदा गरोदर राहिल्या. यंदा काहीही करुन आपलं बाळ जिवंत राहिलं पाहिजे, असा त्यांनी निर्धार केला होता. हातावर पोट असूनही या दाम्पत्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेतले, महागडी औषधं घेतली.

सहा जानेवारीला साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात हिरकन्या यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. पहिल्यांदाच जिवंत बाळ जन्माला आल्याने सर्व आनंदित होते. मात्र जन्माला आलेली मुलगी अवघ्या एक किलो वजनाची होती.

चिमुकलीला भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील SNCU मध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिला दोन दिवस ठेवण्यात आले. मात्र आठ तारखेच्या रात्री लागलेल्या आगीत हिरकन्या आणि हिरालाल यांची मुलगी आगीत होरपळून मृत्युमुखी पडली.

आधी चार वाईट अनुभव गाठीशी असलेल्या हिरकन्या आणि हिरालाल यांनी यंदा आपल्या घरी लहान मूल नांदेल, हसेल, खेळेल असे स्वप्न पाहिले होते. मात्र शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराने त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला. (Gondia lady who lost baby Bhandara Hospital Fire fifth time)

…म्हणून सातव्या महिन्यात प्रसुती

बाळंतपणाच्या सातव्या महिन्यातच हिरकन्या यांची प्रसुती झाली होती, त्यालाही एक दुर्दैवी घटना कारणीभूत ठरली होती. हिरकन्या यांच्या घरी शौचालय नव्हते. काही दिवसांपूर्वी बाहेर शौचाला जाताना त्या पडल्या आणि त्यांच्या गर्भाशयाला मार बसला. त्यामुळे त्यांची प्रसुती लवकर करावी लागली.

या घटनेला डॉक्टरच कारणीभूत आहेत, असे भानारकर कुटुंबियांना वाटत आहे. आपल्याला लवकर न्याय मिळावा अशी मागणी हिरकन्या आणि हिरालाल यांनी केली आहे. नियतीचं चुकलेलं दान आता तरी त्यांच्या पदरी पडेल का, हा प्रश्न विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.