घटना, त्यांची आणि आपली

अमेरिकेतील अध्यक्षीय सत्तेच्या हस्तांतरणाचा तमाशा आज सारे जग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. वस्तुत: दर चार वर्षांनी होणाºया तेथील अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन डेमॉक्रॅटिक पक्षाचे बिेडेन हे राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यांच्या घटनेनुसार येत्या वीस जानेवारी रोजी बिडेन यांनी पदभार स्वीकारणे अपेक्षित आहे. पण मावळते अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प हे काही आपला पराभव मानायला तयार नाहीत. घटनेनुसार तेच आज अध्यक्ष असल्याने व 19 जानेवारीपर्यंत अध्यक्ष राहणार असल्याने आपल्या अधिकाराचा वापर करुन ते बिडेन यांच्या शपथविधीमध्ये अडथळे आणण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. हे प्रयत्न कदाचित घटनेनुसार त्यांच्या अधिकारातील असतीलही पण त्यात हिंसाचाराचा समावेश असू शकत नाही. पण बुधवारी कॅपिटॉलमध्ये घडलेल्या हिंसाचारामुळे अमेरिकन लोकशाहीची व विशेषत: डोनाल्ड ट्रम्प यांची संपूर्ण जगात छीथु होत आहे.कारण त्या हिंसाचारात चार लोक ठार झाले आहेत. बहुधा हे अमेरिकेच्या सत्ताहस्तांतरणातील सर्वाधिक हिंसक हस्तांतरण ठरत असावे. एवढेच नाही तर आता ट्रम्प यांचे मंत्रिमंडळच त्यांची अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करायला सिध्द होत आहे.अमेरिकन घटनेनुसार अध्यक्षाला पदावरुन हटविणे अतिशय अवघड आहे. संसद त्याला हटवू शकत नाही. फक्त उपाध्यक्ष मंत्रिमंडळाची बैठक बोलावून व त्यात प्रस्ताव संमत करुन अध्यक्षाला हटवू शकतात. ती प्रक्रिया सुरु झाल्याचे दिसत आहे.
अर्थात त्यांच्या घटनेनुसार व बुध्दीनुसार या तिढ्यातून जो काही मार्ग निघायचा असेल तो निघेलच. पण या निमित्ताने त्यांची घटना व घटनात्मक व्यवहार आणि आपली घटना व घटनात्मक व्यवहार यांची तुलना अपरिहार्य ठरते. तशी अमेरिकेची घटना दोनशे वर्षे जुनी आहे.तिचा जन्म यादवीतूनच झाला आहे. त्या तुलनेत आपली घटना वयाने सत्तर वर्षाची असेलही पण मूलत: ती सांसदीय माार्गाने तयार झाली आहे व ती अधिक प्रगल्भ आहे असे मोठ्या अभिमानाने म्हणावे लागेल. 26 जानेवारी1950 रोजी आपली घटना अमलात आली. तत्पूर्वी आपल्या घटना समितीने तिच्या निर्मितीसाठी प्रदीर्घ आणि सखोल विचारविनिमय केला. तिची अनेक वैशिष्ट्ये आहेत पण ती सांगण्याची ही वेळ नाही. एक वैशिष्ट्य मात्र आताच सांगावे लागेल व ते म्हणजे गेल्या सत्तर वर्षांच्या काळात कुणाला एकही प्रसंग असा सांगता येणार नाही की, ज्यावेळी आपली घटना कुचकामी ठरली. या सत्तर वर्षांच्या काळात आपल्याकडे लोकसभेच्या सतरा निवडणुकी झाल्या व तेवढ्या वेळाच सत्तेची हस्तांतरणे झाली. पण एकाही सत्तांतराच्या वेळी अमेरिकेसारखा हिंसक प्रकार घडला नाही. अगदी 1977चे सत्तांतर तर आणिबाणीच्या म्हणजे दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर झाले. पण त्यावेळीही तेव्हाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला नाही. जोपर्यंत कॉंग्रेस पक्षाला निर्भेळ बहुमत प्राप्त होत होते तोपर्यंत अडथळ्याचा प्रश्नच नव्हता. पण जेव्हा विरोधी पक्षांकडे सत्ता सोपविण्याचा प्रसंग आला तेव्हाही आपले सत्तांतर घटनेनुसारच झाले. 1996 मध्ये तर लोकसभेत कोणत्याच पक्षाला वा निवडणूकपूर्व आघाडीला बहुमत मिळाले नव्हते. त्रिश्ांकु लोकसभा तयार झाली होती. पण तरीही आपल्या घटनेनेच त्यातून मार्ग काढला व सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजे त्यावेळी भाजपाला पहिल्यांदा सरकार बनविण्याची संधी मिळाली आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. ते सरकार प्रथम तेरा दिवस, नंतर तेरा महिने चालले हा भाग वेगळा पण पेचप्रसंग मात्र निर्माण झाला नाही.
2004 मध्ये वाजपेयी सरकारने बहुमत गमावले. पण कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी भाजपेतर पक्षांनी संपुआ नावाची आघाडी बनविली आणि शंततापूर्ण वातावरणात सत्तांतर झाले. पुढे 2014 मध्ये संपुआने बहुमत गमावले, भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमत मिळविले आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार बनविले.2014 नंतर आणि 2019 पूर्वी आपल्याकडे कुमार केतकरांसारख्या विचारवंतांनी ती शेवटची निवडणूक ठरणार असे भाकित केल्यानंतरही 2019ची निवडणूक शांतपणे पार पडली व घटनेनुसारच सत्तांतर झाले. एवढेच नाही तर राज्य विधानसभांच्या निवडणुकीनंतर अनेक राज्यात विरोधी पक्षांची सरकारे स्थापन झाली. दोन निवडणुकींच्या मधल्या काळात सत्तारुढ पक्ष व विरोधी पक्ष यांच्यात वेळोवेळी हमरीतुमरी झाली असेल, निवडणूक प्रचारकाळात तणाव निर्माण झाला असेल. सरकारविरोधी आंदोलनेही झाली असतील पण प्रत्येक वेळी सत्तांतर मात्र लोकेच्छा आणि घटना यांना अनुसरुनच आणि कोणताही पेचप्रसंग निर्माण न होता झाले. यावरुन आपल्या घटनाकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली किती सखोल आणि दूरचा विचार करुन आपली घटना बनविली असेल याची कल्पना येते आणि स्वाभाविकपणेच आपला उर अभिमानाने भरुन येतो. जगातील सर्वात जुन्या व सर्वात प्रगत देशातील लोकशाहीचे आज अमेरिकेत धिंडवडे निघत असतांना आपल्या लोकशाहीचा आणि घटनेचा गौरव तिच्या रक्षणाची आपली जबाबदारी शतपटींनी वाढवितो यात संशय नाही.

ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.