चंद्रपूर : ताडोबातील वाघीण महिनाभरापासून बेपत्ता

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तीन बछडे वाघिणीपासून दुरावल्यामुळे एका बछडय़ाचा अशक्तपणाने मृत्यू झाला, तर दोन बछडय़ांवर उपचार सुरू आहेत. या बछडय़ांपासून दुरावलेल्या वाघिणीचा मागील एका महिन्यापासून कसून शोध घेण्यात आला. मात्र, कुठेही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे वाघिणीची शिकार झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रात ऑक्टोबर २०२० रोजी गस्तीदरम्यान क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना वाघिणीचे तीन बछडे अशक्त स्थितीत आढळले. त्यापैकी एक बछडा अत्यंत गंभीर असल्याने त्याला उपचाराकरिता चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात पाठवले. परंतु त्याचा मृत्यू झाला तर दोन बछडय़ांवर उपचार सुरू आहेत.

बछडय़ापासून दुरावलेल्या वाघिणीचा शोध मागील एका महिन्यापासून सुरू आहे. वाघिणीचा अधिवास क्षेत्र, बफर, कोअर, वनविकास महामंडळ तसेच संभावित क्षेत्रामध्ये शोध घेण्यात आला. मात्र, कुठेही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे या वाघिणीची शिकार झाल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय पिकांच्या सरंक्षणासाठी अनेक शेतकरी जिवंत विद्युत तारेचे कुंपण करतात. या विद्युत तारांच्या स्पर्शाने वाघाचा मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे जिल्हय़ात समोर आलेली आहेत. या वाघिणीचा मृत्यूही अशाच प्रकारे झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघिणीच्या शोधासाठी खडसंगी वनपरिक्षेत्रात ५२ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, एकाही  कॅमेऱ्यांमध्ये तिचे छायाचित्र आलेले नाही. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांना विचारले असता ते म्हणाले, शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र वाघिणीचा  पत्ता लागलेला नाही.

दोन वर्षांत पाच वाघांचा मृत्यू

ताडोबा प्रकल्पात २०१८ ते २०२० या कालावधीत पाच वाघांचा मृत्यू झाला. वाघांसोबतच या काळात रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, बिबट अशा ३२ वन्यप्राण्यांनाही जीव गमवावा लागला. याशिवाय विविध घटनांमध्ये ५० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बेपत्ता वाघिणीचा शोध वेगवेगळय़ा प्रकारे सुरू आहे. आजवर जंगलात शोध घेतला जात होता. आता बाहेरही शोध सुरू आहे. काही घातपात झाला की कसे, या दृष्टीने गुप्तपणे माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

– डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प.

वाघीण अधिवास क्षेत्र व बछडय़ांना सोडून महिनाभर कधीच विलग होत नाही. वाघीण बछडय़ापासून विलग होऊन नंतर परत आल्याची इतिहासात नोंद नाही. 

– बंडू धोतरे, अध्यक्ष, इको-प्रो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.