पुरातून दुचाकी काढणे बेतले जीवावर; दोन तरुण गेले वाहून

यवतमाळ : तालुक्यातील वसंतनगर येथील काळी (दौ) कडे जाणाऱ्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याच्या नादात दोन युवक वाहून गेले. ही घटना सोमवारी (ता.६) रात्री ७ वाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे या तरुणांनी दुचाकी पुराच्या पाण्यातून काढण्याचा नाद जीवावर बेतला. ज्ञानेश्वर जाधव (वय २८), सुरेश महिंद्रे (वय २७) असे वाहुन गेलेल्या युवकाचे नाव आहे. ते महागाव तालुक्यातील साई ईजारा गावचे रहिवासी आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिग्रससह तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. सोमवारी (ता.७) सुद्धा सायंकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, तालुक्यातील काळी (दौ) ते दिग्रस मार्गावर असलेल्या वसंतनगर येथील पुलावरून पाणी वाहत असताना देखील दोन युवकांनी दुचाकी घेऊन पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, देखील दुचाकी घेऊन जाण्याचा नाद त्या दोन्ही तरुणांना चांगलाच भोवला. दुचाकी घेऊन पूल पार करत असताना दोन्ही तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. पुलाजवळ उभ्या असलेल्या नागरिकांनी या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोघांनी कुणाचेही एक ऐकले नाही. तरुण वाहून जात असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दुचाकी धरून मागे ओढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुचाकी तर मागे आली. परंतु, दोन्ही तरुण वाहून गेले. याबाबत दिग्रस पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी रवाना केले. शोधकार्यादरम्यान मंगळवारी (ता.७) सकाळी ज्ञानेश्वर जाधव याचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर मिळाला असून सुरेश महिंद्रे याचा मृतदेह अद्याप मिळाला नाही. त्यामुळे पोलीस पथकाकडून सुरेश महिंद्रे याच्या मृतदेहाचे शोधकार्य अजूनही सुरू आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.