तुम्ही तुमचं जेवण करा, आम्ही आमचं जेवून घेऊ; मंत्र्यांसोबत जेवण्यास शेतकऱ्यांचा नकार

नवी दिल्ली :शेतकरी आंदोलनाचा आज (4 जानेवारी) 40 वा दिवस आहे. मात्र, अद्यापही सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि केंद्रातील मोदी सरकारमध्ये आज 8 वी बैठक (Farmers Government Meeting) होत आहे. या बैठकीतच हे आंदोलन संपणार की पुढेही सुरु राहणार यावर निर्णय होईल. शेतकरी नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे यावर सरकार काय भूमिका घेतं हे पाहावं लागणार आहे

बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपलं जेवण सामूहिक लंगरमधून मागवलं होतं. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्र्यांसोबत जेवणास नकार दिला आणि तुम्ही तुमचं जेवण करा, आम्ही आमचं जेवून घेऊ, अशी भूमिका मांडली. दिल्लीतील विज्ञान भवनात ही बैठक होत आहे. या बैठकीत मोदी सरकारचे मंत्री 3 नव्या कृषी कायद्यांवर शेतकऱ्यांशी बोलत आहेत.

बैठक सुरु होण्याआधी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली

शेतकऱ्यांची सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठक सुरु होण्याआधी सर्वांनी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना 2 मिनिटं शांत राहून आदरांजली वाहिली. आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. काहींनी आत्महत्या केलीय, काहींना कडाक्याच्या थंडीत आपला जीव गमावावा लागला, तर काहींचा अपघातात मृत्यू झालाय.

शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीत मोदी सरकारच्या वतीने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि राज्य मंत्री सोम प्रकाश हे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्यावतीने या बैठकीत 40 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात शेतकरी आंदोलनाप्रकरणी जनहित याचिका दाखल

आज ‘ह्यूमन राईट्स फॉर पंजाब’ या एनजीओकडून काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवले होते. यात त्यांनी हरियाणा सरकारकडून आंदोलक शेतकऱ्यांवर होणारा लाठीचार्ज आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापराचा मुद्दा उचलला आहे. तसेच हा प्रकार शेतकऱ्यांच्या मुलभूत मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या पत्रालाच जनहित याचिका म्हणून दाखल करुन घेतलं आहे.

अभिनेते धर्मेंद्र शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ

अभिनेते धर्मेंद्र यांनी सार्वजनिकपणे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळो ही इच्छा व्यक्त केलीय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “आज माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळो. मी अगदी प्राणपणाने त्यांना न्याय मिळण्याची इच्छा व्यक्त करतो. तसं झालं तर अनेक लोकांना समाधान मिळेल.”

आज सकारात्मक मार्ग निघण्याची आशा : कृषि मंत्री

कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, “मला आशा आहे की आज शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीत काही सकारात्मक मार्ग निघेल. आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चा करु.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.