शेतकरी आंदोलनामुळे विदर्भातील व्यापाऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान

नागपूर : नवा कृषी कायदा मागे घेण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका विदर्भाच्या व्यापाऱ्यांना बसला आहे.  आंदोलनामुळे दिल्लीकडून विदर्भाकडे येणारी आणि विदर्भाकडून दिल्लीकडे जाणारी मालवाहतूक प्रभावीत झाल्याने व्यापाऱ्यांना आतापर्यंत दोन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. नेहमीचा मार्ग सोडून सध्या राजस्थानमाग्रे वाहतूक करावी लागत असल्याने त्यांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

सुरुवातीला आंदोलन तीव्र असल्याने तब्बल आठ दिवस दिल्लीत तीस हजार ट्रक जागीच उभे होते. त्यामुळे दिल्लीच्या व्यावसायिकांना देखील १५ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती सुरळीत नाही. परिणामी मालवाहतूक राजस्थानमाग्रे वळवण्यात आली आहे. त्यामुळे माल पोहचण्यास विलंब होत असून भाडे देखील वाढले आहे. दिल्लीहून मालवाहू ट्रक विदर्भात आला तर जातेवेळी तो संत्रा अथवा करारानुसार इतर माल घेऊन परत जातो. आधी नागपुरात दररोज असे दोनशे ट्रक दिल्लीहून येत होते. आता त्याची संख्या रोडावली आहे.

दिल्लीहून आणि नागपुरातूनही मालासाठी पूर्व नोंदणी कमी झाली आहे. सध्या गोदामात शिल्लक माल असल्याने वस्तूंचे दर नियंत्रित आहेत. मात्र आंदोलन अधिक काळ चालले तर जानेवारी वा फेबुवारीत हे दर वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे. दिल्लीकडून विदर्भाच्या बाजारपेठांमध्ये सुका मेवा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बासमती तांदूळ, वाहनांचे सुटे भाग, फळ, कपडे, कंपन्यांना लागणारा कच्चा माल येतो. तर विदर्भाच्या बाजारपेठातून मिर्ची, हळद, सागवान, संत्री, सुपारी, डाळ,तांदूळ, चना, लोखंड, सिमेंट तिकडे जाते.

दिल्ली ते नागपूर मालवाहतुकीस तीन दिवस लागतात. मालवाहू ट्रकच्या टनाची क्षमता यावरही प्रवासाचे दिवस अथवा भाडे अवलंबून असते. त्यात या शेतकरी आंदोलनाची भर पडल्यामुळे विदर्भातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

शेतकरी आंदोलनामुळे विदर्भात येणारा माल विलंबाने पोहचत आहे. आंदोलनाच्या सुरुवातील स्थानिक मालवाहतूकदारांनी दिल्लीकडे जाण्यास नकार दिला होता.  त्याचा फटका  बसला. आता इतर माग्रे मालवाहतूक सुरू आहे. मात्र त्यासाठी व्यापाऱ्यांना जादा रक्कम मोजावी लागत आहे. जी परवडणारी नाही. मात्र पूर्व नोंदणी केल्यामुळे मालाची खरेदी करावीच लागत आहे. या आंदोलनामुळे विदर्भाच्या व्यापाऱ्यांचे सुमारे दोन हजार कोटींचे नुकसान होत आहे.

बी. सी. भरतियाअध्यक्षकॉन्फ्रिडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.