एसटीतील खुल्या जागांवर इतर प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नोकरभरती रद्द होण्याची शक्यता

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या मराठवाडा विभागात नोकऱ्यांमधील खुल्या जागांवर विविध मागास घटकांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून या बदल्यांमुळे रोस्टर पूर्ण झाल्याने एसटीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नोकरभरती रद्द होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
एसटी परिवहन मंडळात इतर शासकीय विभागातील नोकऱ्यांप्रमाणे एसटीतही आरक्षण आहे. अनुसूचित जातीसाठी १३ टक्के राखीव जागा आहेत. तसेच अनुसूचित जमाती ७ टक्के, विशेष मागासवर्ग २ टक्के, विमुक्त जाती व जमाती ११ टक्के, इतर मागासवर्ग १९ टक्के, तर खुल्या वर्गासाठी ४८ टक्के आरक्षण आहे. सध्या महामंडळात ३६ हजार ३८८ चालक, ३० हजार १८३ वाहक, ७ हजार ९३३ सहाय्यक याशिवाय यांत्रिकी कर्मचारी, वाहतूक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी असे एकूण ९७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. खुल्या प्रवर्गासाठी ४८ टक्के जागांपैकी मराठवाड्यातील बहुतेक विभागात आतापर्यंत केवळ २० टक्के जागा भरल्या आहेत, अशी माहिती एसटीतील बड्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. एसटीमध्ये २०१४-१५, २०१६-१७ व २०१८-१९ अशी तीन वेळा नोकरभरती झाली आहे. यामध्ये चालक, वाहक, सहाय्यक यांचा समावेश होता. ही भरती प्रक्रिया सर्व जिल्ह्यांमध्ये असल्यामुळे मराठवाड्यातील अनेक उमेदवार मराठवाड्याबाहेरील जिल्ह्यांमधून भरती झाले होते, परंतु नोकरी लागल्यानंतर यामधील अनेक उमेदवारांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये बदल्या करून घेतल्या आहेत. रोस्टरप्रमाणे मराठवाड्यातही खुल्या प्रवर्गासाठी ४८ टक्के जागा राखीव आहेत. या विभागात खुल्या वर्गाचे आतापर्यंत केवळ २० टक्के रोस्टर पूर्ण झाले आहे. वैयक्तिक व कौटुंबिक कारणे सांगून तसेच राजकीय नेत्यांच्या शिफारसी आणून मराठवाडा विभागात विविध मागास घटकांतील कर्मचाऱ्यांनी बदल्या करून घेतल्या असल्याचे समजते. मागासवर्गीयांचे रोस्टर याआधीच पूर्ण झाल्यामुळे खुल्या वर्गासाठीच्या उर्वरित २८ टक्के जागांवर विविध मागास घटकांतील कर्मचाऱ्यांनी तडजोड करून घेतली आहे. मराठवाड्यातील खुल्या जागांचे रोस्टर अशा पद्धतीने पूर्ण झाल्यामुळे भविष्यात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एसटीच्या नोकरभरतीचा मार्ग खडतर झाल्याची भीती अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातील रोस्टरप्रमाणे खुल्या वर्गाचा कोटा यापूर्वीच भरल्यामुळे स्थानिक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नोकरभरतीसाठी इतर जिल्ह्यांत म्हणजेच कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जावे लागत आहे. नोकरभरतीनंतर इतरांप्रमाणे आपल्या जिल्ह्यात बदलीसाठी प्रयत्न करतात, पण रोस्टर अगोदरच पूर्ण झाल्यामुळे बदलीसाठी त्यांना कसरत करावी लागत आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.