अमरावती जिल्ह्यात बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू

अमरावती : बैलपोळ्यानिमित्त गावाशेजारील शेत तलावात बैल धुण्याकरिता गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दर्यापूर तालुक्यातील सांगळूद येथे सोमवारी दुपारी घडली. दरम्यान, अशाचप्रकारे रिद्धपूरनजिकच्या सूलतानपूर शेतशिवारातही एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला.
दिवाकर समाधान सराटे (३०) असे बुडून मृत्यू झालेला युवकाचे नाव आहे. पोळ्याचा सण हा ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात शेतकरीबांधव साजरा करतात. त्याअनुषंगाने दिवाकर सराटे हेसुद्धा बैलांना आंघोळ करण्यासाठी गावाशेजारील तलावामध्ये दुपारी तीनच्या सुमारास गेले होते; मात्र, तलावामध्ये जास्त प्रमाणात पाणी असून, त्यात गाळही मोठ्या प्रमाणात साचला होता. त्यामुळे दिवाकर सराटे हे गाळामध्ये अडकले व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. येवदा पोलिसांनीही घटनास्थळी तातडीने धाव घेतली. गावातील युवकांच्या मदतीने दिवाकर सराटे यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे गावामध्ये दु:खाचे वातावरण असून, नागरिकांनी आज पोळा साजरा न करण्याचा निर्णय घेतला. मृतकच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण आप्त परिवार आहे़ दरम्यान, रिद्धपूरजवळच्या ब्राह्मणवाडा (दिवे) गावातील शेतकरी राजेश मधुकर रोकडे (४५) हे सुलतानपूर शेतशिवारातील खोल पाण्यात आपल्या बैलांना आंघोळ करण्यासाठी खाली उतरले होते; पण खोल पाण्याची माहिती नसल्यामुळे ते पाण्यात बुडाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच शिरखेड पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मृतदेह बाहेर काढून मोर्शीला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलीस कर्मचारी संजय वाघमारे हे तपास करीत आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.