वाळू तस्करीतील दोन ट्रक जप्त चार आरोपी अटकेत

कामठी
अवैधरित्या कन्हान नदी वाळू (रेती) घाटावरून अवैधरित्या रेतीची चोरी करून ट्रकमध्ये रेती भरून नागपूरकडे घेऊन जात असताना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर लीहीगाव शिवारात नवीन कामठी पोलिसांनी सापळा रचून रेती चोरीचे दोन ट्रक जप्त करून चार आरोपीस अटक करून त्यांच्याकडून ३४ लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई सोमवारी मध्यरात्री दीड वाजता सुमारास केल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कामठी पोलिस स्टेशनचे पथक लिहीगाव मार्गावर रात्रंकालीन गस्त घालत असताना पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा दहाचाकी ट्रक क्रमांक एम. एच. ४0 / ए. के. ४५२५ याला थांबवून चौकशी केली असता त्या ट्रकमध्ये विनापरवाना पाच ब्रास वाळू आढळून आल्याने वाहन जप्त करून वाहन चालक आरोपी राजेंद्रसिंग भालसिंग राजपूत (वय ४३) रा. पारडी नागपूर, कंडक्टर बंटी उर्फ हरिशंकर जगनाथ सनोडिया (वय २९) रा. भांडेवाडी, पारडी नागपूर, वाहनात माल भरून देणारा अमित मेर्शाम (वय २७) रा. कांद्री कन्हान व ट्रकमालक अक्षय राजू गात (वय २४) रा. नवीन डायमंडनगर, नागपूर या चौघांना अटक करून त्यांच्याकडून १७ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याच मार्गावर सकाळी सहा वाजताच सुमारास ट्रक क्रमांक एम. एच. ४0 / वाय. ९६७५ कन्हान नदी रेतीघाटावरून विनापरवाना अवैधरित्या रेतीची चोरी करून ट्रकमध्ये रेती भरून नागपूरकडे घेऊन जात असताना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर लिहीगाव शिवारात नवीन कामठी पोलिसांनी सापळा रचून पकडले. मात्र, ट्रकचालक मालक पोलिसांना बघताच ट्रक सोडून पसार झाले. पोलिसांनी १७ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून रेतीच्या रॉयल्टी संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी कन्हान नदी रेतीघाटावरून रेती चोरी केल्याचे कबूल केले असता पोलिसांनी दोन्ही ट्रक नवीन कामठी पोलिस ठाण्यात लावून नवीन कामठी पोलिस स्टेशनला कलम ३७९, ३४ भादंवीनुसार गुन्हा दाखल करून चारही आरोपीना अटक केली.
प्रत्येक ट्रकमध्ये पाच ब्रास रेती किंमत २५ हजार व ट्रकची किंमत प्रत्येकी १७ लाख, असा एकूण ३४ लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे रेतीमाफियाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. वरील कारवाई पोलिस उपायुक्त नीलोत्पल, एसीपी रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात नवीन कामठीचे ठाणेदार संजय मेंढे, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश कन्नके, कॉन्स्टेबल पप्पू यादव, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनोजिया, संदीप गुप्ता, उपेन्द्र यादव यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.