Home Artical Blog सावनेर येथे 125 फूट उंच राष्ट्रीय ध्वजस्तंभाचे अनावरण

सावनेर येथे 125 फूट उंच राष्ट्रीय ध्वजस्तंभाचे अनावरण

0

• सावनेर नवनिर्माणसाठी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांचे विविध उपक्रम आणि लोकार्पण.
• हनुमान जयंतीनिमित्त भजनसंध्या व महाप्रसादाचे देखील आयोजन.

सावनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या, विदर्भातील सर्वात उंच, 125 फूट उंच राष्ट्रीय ध्वजस्तंभाचे 02 एप्रिलला, हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर, सावनेर येथील गांधी चौकात आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. यासोबतच, महात्मा गांधी चौक सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा देखील संपन्न झाला. या भव्य तिरंगा ध्वजस्तंभामुळे सावनेर शहराला एक नवी ओळख प्राप्त झाली आहे.

सावनेरचे लोकप्रिय आमदार डॉ.आशिषराव देशमुख यांची ‘सावनेर नवनिर्माण’ ही संकल्पना असून यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित हजारो नागरिकांनी अभिमानाने देशभक्तीची भावना व्यक्त केली. या उपक्रमांतर्गत गांधी चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले असून परिसरात आकर्षक प्रकाश व्यवस्था, सुरक्षित वाहतूक नियोजन आणि सुंदर डिझाईन विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आकर्षक बनला आहे. याप्रसंगी शववाहिकेचे लोकार्पण, 26 कोटी निधीच्या सावनेर – बोरुजवाडा मुख्य रस्ता रुंदीकरणाचे भूमिपूजन आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण देखील करण्यात आले.

यावेळी आयोजित भव्य कार्यक्रमात आमदार डॉ.आशिषराव देशमुख म्हणाले की, “सावनेर ‘नवनिर्माण’ संकल्पनेतून सावनेर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प आहे. 125 फूट उंच तिरंगा हा केवळ ध्वजस्तंभ नसून तो आपल्या देशभक्तीचा, एकतेचा, अखंडतेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे. तिरंग्याचा प्रत्येक रंग आपल्याला सकारात्मक संदेश देतो. हनुमान जयंतीच्या निमित्ताने अध्यात्म्याची जोड सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला मिळाली आहे. गांधी चौकाचा हा कायापालट सावनेरच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. भक्ती, शक्ती व निस्वार्थ सेवेचे प्रतीक म्हणून आजचा हनुमान जयंतीचा दिवस आपण सावनेर नवनिर्माण संकल्पनेला गती मिळावी म्हणून निवडला आहे. सावनेर नवनिर्माण म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला न्याय, प्रत्येक तरुणाला रोजगार आणि भ्रष्टाचाराला पूर्णविराम. शेतकऱ्यांचा घाम वाया जाऊ देणार नाही. कृषी, शिक्षण, आरोग्य, अध्यात्म अशा अनेक बाबींचा आपण विकास करू. या क्षेत्रात 80 हजार कोटींचा प्रकल्प आणू शकलो आणि त्यातून मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. माझे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. आपणा सर्वांचा सहयोग मला सावनेर नवनिर्माणासाठी मिळेल, ही अपेक्षा आहे. सावनेरला विकास आणि समृद्धी हवी आहे प्रत्येक कुटुंबाला आर्थिक समृद्धी मिळावी, अशी माझी इमाने इतबारे इच्छा आहे, त्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि जनतेची सेवा करीत आहे.”

नुकतेच रामनवमीच्या शुभ पर्वावर सावनेर येथे आमदार डॉ.आशिषराव देशमुख यांच्या पुढाकाराने विश्वशांतीसाठी विश्वविक्रमी महाआरती करून वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आला होता. याची ऐतिहासिक नोंद ‘गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंदविण्यात आली.

सावनेरला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आणि विकासाची नवी उंची गाठण्यासाठी आमदार डॉ.आशिषराव देशमुख सतत प्रयत्न करत आहेत. नवे उद्योगधंदे, रोजगार, शेती व विकासासाठी करण्यात येत असलेल्या त्यांच्या प्रयत्नांमुळे सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणार, अशी चर्चा सर्वत्र दिसून येते. या क्षेत्रात गुंडागर्दीवर अंकुश ठेवून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘सावनेर नवनिर्माण’ च्या दृष्टीने ही फार मोठी सकारात्मक बाब आहे.

याप्रसंगी हनुमान जयंतीच्या निमित्ताने भक्तीगीते व भजनसंध्या आयोजित करण्यात आली होती. गायिका अनुपमा भटनागर व अधिष्ठा भटनागर यांनी भक्तिमय सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले. गांधी चौक येथील हनुमान मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भजन संध्या व महाप्रसादाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी देखील या उपक्रमांचे कौतुक करत सावनेरच्या विकासासाठी असेच उपक्रम पुढेही राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमाला नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभली. यावेळी डॉ आयुश्री देशमुख, भाजपा नेते डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, नगराध्यक्ष संजना मंगळे, राजू घुगल, भीमराव घुगल, मुख्याधिकारी अर्शिया जूही, सुनील टेम्भुर्णे, प्रफुल्लकांत राऊत, दिगंबर सुरतकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.