महसूल वाढीसाठी चक्राकार पद्धतीचा वापर

स्थानिक ‘आरटीओ’चे आर्थिक लागेबांधे नष्ट करण्याचा प्रयत्न

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्याने कमी झालेला महसूल वाढवण्यासाठी आता परिवहन खात्याने  चक्राकार पद्धतीचा वापर सुरू केला आहे. त्यानुसार राज्यातील सहा प्रादेशिक परिवहन विभागातून (आरटीओ) प्रत्येकी दोन  कार्यालयातील दोन भरारी पथके धुळे, नागपूर आणि पुणे आरटीओ कार्यालय क्षेत्रात १७ डिसेंबरपासून कारवाई करीत आहेत. स्थानिक आरटीओचे  ट्रांसपोर्ट व खासगी बस चालकांशी असलेले आर्थिक लागेबांधे नष्ट करण्याचाही प्रयत्न या नवीन प्रयोगातून केला जात आहे.

परिवहन खात्याच्या आदेशानुसार, प्रादेशिक परिवहन खाते ठाणे आणि पुणे या दोन  कार्यालयांतील मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक असे एकूण तीन अधिकारी असलेले भरारी पथक धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात कारवाई करीत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूरच्या प्रत्येकी तीन अधिकाऱ्यांची चमू प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयांच्या परिसरात  तर आरटीओ धुळे आणि आरटीओ नागपूर शहर व ग्रामीण   कार्यालयांतील पथके पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात कारवाई करीत आहेत. या सर्व  भरारी पथकांना १७ ते ३१ डिसेंबपर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल स्वतंत्र्यपणे परिवहन उप आयुक्त (अंमल- २) यांच्याकडे सादर करायचा आहे. या पथकांवर परिवहन खात्याची विशेष नजर असणार आहे.  स्थानिक आरटीओ कार्यालयांतील भरारी पथकांचे  तेथील ट्रांसपोर्ट व खासगी बस चालकांशी वारंवार संबंध येतात. त्यात काहींचे आर्थिक हितसंबंधही असण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यामुळे या पद्धतीची कारवाई केली जात असल्याची चर्चा परिवहन खात्यात आहे.

‘‘जळगाव आरटीओचे भरारी पथक नागपूर शहर तर कोल्हापूरचे नागपूर ग्रामीणमध्ये पोहचले असून त्यांनी कारवाई सुरू केली आहे. या पथकाला स्थानिक आरटीओला आल्याची केवळ सूचना करून त्यांच्या नियोजनानुसार कारवाई करायची आहे.  या पथकाने जास्तीत जास्त कारवाई करावी यासाठी स्थानिक आरटीओने त्यांच्यावर नजर ठेवायची आहे.’’

– दिनकर मनवर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.