विदर्भवाद्यांच्या मोर्चावर पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर Use of mild force by police on Vidarbha activists’ front

नागपूर : वीजबिलाचा मुद्दा आणि वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी सोमवारी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाऊन घेराव करू पाहणाऱ्या मोर्चेकऱ्यांना अडवून पोलिसांनी वाहनात कोंबले, त्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई करून सायंकाळी सोडण्यात आले. कोरोना काळातील सर्व वीजबिल माफ करावे, विदर्भातील जनतेचा २०० युनिटपर्यंत वीज वापर नि:शुल्क करून त्यापुढील दर निम्मा करावा, कृषी पंपाचे बिल संपवावे आणि वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, रंजना मामर्डे यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून दुपारी १.३० वाजता प्रचंड घोषणाबाजी करीत हा मोर्चा निघाला. विदर्भवाद्यांच्या मागील आंदोलनाचा अनुभव लक्षात घेऊन बेझनबाग चौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. या चौकात बॅरिकेड्‌स लावून मोर्चा अडविल्यावर विदर्भवादी अधिकच भडकले. नितीन राऊत यांना निवेदन स्वीकारण्यासाठी बोलवा अन्यथा निवेदन देण्यासाठी आम्हाला त्यांच्या निवासस्थानी जाऊ द्या, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. मात्र पोलिसांनी मोर्चा रोखून धरला. यादरम्यान ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी झाली. बॅरिकेड्‌स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. धरपकड करून अनेक स्त्री-पुरुषांना वाहनात कोंबले. सुमारे ३०० आंदोलकांना अटक करून पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस मुख्यालयात नेण्यात आले व नंतर सोडून दिले. मोर्चात वीजग्राहक शेतकरी, महिला, तरुणांसह ॲड. मोरेश्‍वर टेंभुर्डे, अ‍ॅड. शरद कारेकर, मुकेश मासूरकर, अरुण केदार, रेखा निमजे, सुनिता येरणे, सुनील वडस्कर, रमेश लांजेवार, पुरुषोत्तम पाटील, कृष्णा भोंगाडे, अरुण नवले, अरुण वासलवार, नरेंद्र काकडे, किशोर पोतनवार, कविता जुनघरे, विजय मौंदेकर, अ‍ॅड. चैताली कटकवार, माधुरी पाझारे, माधुरी चव्हाण, धीरज मांढरे यांच्यासह अनेकांचा समावेश होता. ही तर दडपशाही – राम नेवले चर्चा करण्यासाठी निवेदन घेऊन येणार असल्याने आम्ही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना आम्ही १५ दिवसापूर्वीच कळविले होते. तरीही निवेदन न स्वीकारता ते गैरहजर राहिले. हा विदर्भाचा अपमान आहे. मात्र चर्चेला न येता पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केली. ही दडपशाही असल्याचा आरोप राम नेवले यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.