देशात घरोघरी जाऊन लसीकरण शक्य नाही : सुप्रीम कोर्ट


नवी दिल्ली : देशातील वैविध्यपूर्ण परिस्थिती लक्षात घेतली तर घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचवणे शक्य नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सद्य:स्थितीतील लसीकरणासंबंधीचे धोरण संपुष्टात आणत नवे दिशा-निर्देश देण्यास नकार दिला. दिव्यांग आणि समाजातील दुर्बल वर्गातील लोकांना घरोघरी जाऊन लसीचे डोस देण्याची मागणी करणारी याचिका खंडपीठाने यावेळी फेटाळून लावत अगोदरच देशातील ६० टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आल्याचे नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड, न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ‘युथ बार असोसिएशन’च्या यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. देशातील वेगवेगळी स्थिती पाहता प्रत्येकाला घरी जाऊन लस देणे अशक्य असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने असोसिएशनला आपल्या सल्ल्याबाबत आरोग्य मंत्रालयाच्या सक्षम प्राधिकरणशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले. खंडपीठ म्हणाले की, लडाखमधील स्थिती ही केरळपेक्षा वेगळी आहे. उत्तरप्रदेशमधील परिस्थिती ही अन्य राज्यांपेक्षा भिन्न आहे. शहर आणि ग्रामीण भागातील स्थितीमध्ये मोठा फरक आहे. विशालकाय देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या समस्या आहेत. अशा स्थितीत संपूर्ण देशासाठी एका आदेशाची मागणी करतेवेळी आरोग्य प्रशासनासमोरील इतर अडचणी लक्षात घेणे आवश्यक आहे. अगोदरच सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत देशातील ६० टक्के लोकसंख्येला पहिला डोस देण्यात आला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीतील धोरण संपुष्टात आणता येणार नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच असोसिएशनकडून बाजू मांडणाऱ्या वकील बेबी सिंग यांना इतक्या असंवेदनशीलपणे याचिका दाखल करता येणार नसल्याचे खंडपीठाने बजावले. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेच्या स्थितीची न्यायालयाने स्वत: दखल घेतलेली आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर न्यायालयाचे लक्ष असल्याचेही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. दिव्यांग, समाजातील दुर्बल घटकांना ‘को-विन’पोर्टलवर जाऊन लसीकरणासाठी नोंदणी करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना घरोघरी जाऊन लस देण्यासाठी केंद्र व राज्यांना निर्देश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.