देशात आतापर्यंत ४० कोटी नागरिकांचे लसीकरण


नवी दिल्ली : कोरोना विरुद्धच्या लढाईत महत्त्वाचे अस्त्र असणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत आतापर्यंत एकत्रित ४० कोटी जणांना लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ४० कोटी ४४ लाख ६७ हजार ५२६ जणांनी लस घेतली. शनिवारी दिवसभरात ४६ लाख ३८ हजार १०६ जणांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १ कोटी २ लाख ६८ हजार ८८२ इतकी आहे, तर ७५ लाख ३८ हजार ८७७ जणांना दोन्ही डोस घेतले आहेत. फ्रंट लाइन वर्कर्समध्ये १ कोटी ७७ लाख ९१ हजार ६३५ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस १ कोटी ३ लाख ४१ हजार ८४८ जणांनी घेतला आहे. लसीकरण मोहिम तीन वयोगटात टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात आली होती. यामध्ये ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये ७ कोटी २० लाख ६१ हजार ३२७ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ३ कोटी ११ लाख ७५ हजार ९५२ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. ४५ वर्षांवरील ९ कोटी ७४ लाख १८ हजार ७८९ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस २ कोटी ९० लाख १२ हजार २८९ जणांनी घेतला आहे.
१८ ते ४४ वयोगटातील १२ कोटी ४० लाख ७ हजार ६९ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ४८ लाख ५० हजार ८५८ इतकी आहे. इतर वयोगटातील नागरिकांच्या तुलनेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी दुसरा डोस घेण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसते. एकूण लस घेतलेल्यांपैकी ३२ कोटी १५ लाख ४७ हजार ७०२ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ८ कोटी २९ लाख १९ हजार ८२४ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या ४९ हजारांच्या आत आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात देशात ३८ हजार ७९ नवीन रुग्ण आढळले. तर ५०६ जणांचा मृत्यू झाला. दिलासा देणारी बाब म्हणजे शुक्रवारी ४३ हजार ९१६ जण कोरोनामुक्त झाले. देशाचा रिकव्हरी रेट ९७.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.