विधानभवनाचा मनपाकडे ४० लाखांचा मालमत्ता कर थकीत

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या नागपुरातील विधानभवनाचा मनपाकडे ४० लाखांचा मालमत्ता कर थकीत आहे. २०१६-१७ सालापासूनचा हा थकीत कर आहे.

२०१६-१७ सालापासूनचा हा थकीत कर आहे. एकीकडे विधानभवन, आमदार निवास आणि इतर बंगल्याच्या नूतनीकरण व सौंदर्यीकरणासाठी लाखोंचा निधी असतो. मात्र, मनपाचा मालमत्ता कर भरण्यास विभाग कुठलीही तत्परता दाखवित नसल्याचा सूर ऐकू येऊ लागला आहे.

महापालिकेच्या या विभागातील माहितीनुसार, दरवर्षी विधानभवनाचा मालमत्ता कर हा आठ लाख येतो. २०१५-१६ पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने मालमत्ता कर प्रामाणिकपणे भरला. त्यानंतर २०१६पासून कर थकला. यावर आठ लाखाचा दंडही वाढला आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने दंडाचे शुल्क माफ करून उर्वरित मालमत्ता कर घेण्याची विनंती केली आहे. केवळ विधानभवनच नव्हे तर राज्य सरकारच्या इतर सरकारी मालमत्तांवर मनपाचा जवळपास ६० कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. मिहान व व्हीएनआयटीवरही कोट्यवधीची थकबाकी आहे. या दोन्ही संस्थांचे जवळपास ५० कोटी रुपये थकले आहेत. मालमत्ता कर भरत असल्याने विधानभवनात अग्निसुरक्षा यंत्रणाही लावण्यात आली आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाने यासंदर्भात प्रमाणपत्रही दिले आहे. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मालमत्ता कर थकीत व वाढत नसल्याने दहाही झोनच्या सहायक आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली आहे. थकीत वसुलीसाठी कडक पावले उचला, असे निर्देश गेल्या बैठकीत दिले.

तब्बल ५७३ कोटी…

शहरातील सरकारी संस्थांची कार्यालये व इतर मोठे थकबाकीदार असे मिळून मनपाची जवळपास ५७३ कोटींची थकबाकी आहे. या आर्थिक वर्षात ५५ हजार मालमत्ताधारकांनी जवळपास ३२ कोटींचा कर भरला आहे. तर, ३.८४ लाख मालमत्ताधारक अद्यापही कुठलाही कर न भरता मनपाच्या सेवेचा फुकटात लाभ घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.