अमरावती जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! अनेक गावांत शिरले पुराचे पाणी

अमरावती : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. तसेच तिवसा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. तिवसा तहसीलदार वैभव फरतारे व बचाव पथकाच्या मदतीने आज सकाळापासूनच अनेक ठिकाणी पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार सुरू आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्प आणि लहान-मोठ्या धरणातील जलसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून नद्यांमध्ये विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे. तसेच तिवसा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील कुर्‍हा, शिरजगाव, मोझरी, शिवणगाव वरखेड यासह पुनर्वसित धारवाडा, दुर्गवाडा या गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले असून मदतीसाठी प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहेत. तसेच तिवसाचे तहसलीदार वैभव फरतारे यांनी बचाव पथकाच्या मदतीने सकाळपासूनच बचावकार्य सुरू आहे. तसेच पुरातून नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस सूरू असून प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पहाटेपासून या धरणाचे एकूण 12 दरवाजे 110 सेंमीने उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून 2138 घमी प्रतीसेकंद विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी केला. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच याठिकाणी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.